अपघातात मृत जवानाच्या कुटुंबीयांकडून हेल्मेट वाटप

अपघातात मृत जवानाच्या कुटुंबीयांकडून हेल्मेट वाटप

दशक्रिया विधी कार्यक्रमात हेल्मेट वाटप करताना हर्ष बोडके व परिवार.

लासलगाव तालुक्यातील काथरगाव येथील दत्तात्रय यादव बोडके या निवृत्त जवानाचा चांदवड तालुक्यात झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हेल्मेट परिधान केले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, या जाणीवेतून कुटुंबावर कोसळलेल्या दु:खातही समाजाला सुरक्षिततेचे महत्व पटवण्यासाठी बोडके परिवाराने दशक्रिया विधीच्या कार्यक्रमातच हेल्मेट वाटप केले.

निफाड तालुक्यातील काथरगाव येथील मुळचे रहिवासी दत्तात्रय यादव बोडके यांनी भारतीय सैन्यदलात सेवा पुर्ण केली. काथरगाव येथे आल्यावर पारंपरिक शेतीला पुरक व्यवसाय उभारण्याची तयारी करत दत्तात्रय बोडके यांनी बाजार समितीत कांदा खरेदीचा व्यवसाय सुरू केला. निफाड येथे स्थायिक झाले. परिवाराचाही उत्कर्ष केला. दोन वर्षापुर्वी वडिलांचे निधन झाले. १२ दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यात रायपूरजवळ त्यांचा दुचाकी अपघातात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. यामुळे मुलगा हर्षसह पत्नी वंदना आई विठाबाई, भाऊ दिलिप, भावजय, तीन बहिणी असा परिवार पोरका झाला. दत्तात्रय बोडके यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. कुटुंबातील कर्ता पुरुषाचा तारूण्यात झालेला मृत्यू इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये, यासाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा, अशा सामाजिक भावनेतून निफाड येथील संगमेश्वर मंदिराजवळ दशक्रिया विधी झाल्यावर पाहुण्यांना मुलगा हर्ष याचे हस्ते हेल्मेट वाटप केले. सामाजिक संदेश अन् कुटुंबातील सदस्यांवर होणारी वेदना, याचा मिलाफ घडवत बोडके परिवाराने नातेवाईक व मित्रपरिवाराला हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून दिले आहे.

First Published on: March 27, 2019 12:21 AM
Exit mobile version