दिवाळीनंतर दुधाची दरवाढ

दिवाळीनंतर दुधाची दरवाढ

नाशिक :  दिवाळीचा सण संपताच 1 नोव्हेंबरपासून दुधाची दरवाढ करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. गायीच्या दुधाच्या दरात सहा तर म्हशीच्या दुधाचे दर आठ रुपयांनी महागनार आहेत. इतकेच नव्हे तर पिशवीतील दुधही महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.

नाशिककरांची दुधाची मागणी सुमारे अडीच लाख लिटर आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी शासकीय दूध योजनेची क्षमता पुरेशी नाही. या योजनेकडून केवळ साडेतीन हजार लिटर दूधसंकलन आणि विक्री केली जाते. नाशिक जिल्हा दूध संघाकडून ‘पंचवटी’ या ब्रॅण्डनेमने दुधाची विक्री केली जाते.

 जवळपास पाच हजार लिटर दुधाचे प्रतिदिन संकलन आणि विक्री होते. याशिवाय शेजारील गुजरात, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतून आणि अहमदनगर, सातारा, पुणे, जळगाव या जिल्ह्यांतून दूध विक्रीसाठी येते. खासगी विक्रेत्यांकडून घरोघरी अगोदरच 40 ते 60 रुपये लिटरपर्यंत भावाने दुधाची विक्री केली जात आहे. आता खासगी संस्थांनीही भाववाढ जाहीर केली आहे.

जूनपासून भाववाढीचा आलेख सातत्याने वर जात असल्याने व त्यात आता दुधाचीही भर पडणार असल्याने सर्वसामान्यांचे बजेट आणखी बिघडणार आहे. पिशवीतील बंद दुधाचे दर अगोदरच वाढलेले आहेत. त्यामुळे घरोघरी विक्री करणार्‍या विक्रेत्यांनीही दिवाळीनंतर दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 नोव्हेंबर 2022 पासून ही दरवाढ लागू होईल.

असे असतील दर
दूधाचा प्रकार        सध्या           नंतर
गाय                    40            46
म्हैस                   60            68
पिशवी                 52            58

First Published on: October 17, 2022 1:10 PM
Exit mobile version