सिटी सेंटरमध्ये थरार, १० मिनिटांत मॉल रिकामा

सिटी सेंटरमध्ये थरार, १० मिनिटांत मॉल रिकामा

अग्निशमन दलाच्या जवानांचे बचावकार्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती.

नाशिकमधील उंटवाडी पुलाजवळील सिटी सेंटर मॉलमध्ये सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागते… सायरन वाजू लागतात… अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याचे पाइप घेऊन आगीच्या दिशेने धावतात… खाली पळा, असा एकच गोंधळ उडतो आणि जिन्याने मॉलमधील सर्व जण बाहेर पडतात… अवघ्या ११ मिनिटांत सिटी सेंटर मॉल रिकामा होतो… अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतलेल्या मॉक ड्रीलनिमित्त सोमवारी, १५ एप्रिलला नाशिककरांनी हा थरार अनुभवला.

कोणत्याही आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन सराव करणे महत्त्वाचे असल्याने सोमवारी मॉक ड्रिल करण्यात आले. कर्मचार्‍यांनी बचाव कार्य, विमोचन कार्य व आग विझवण्याची प्रात्यक्षिके सादर केली. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशामन विभागाचे कर्मचारी आले. त्यानंतर सर्वांना तातडीने मॉलच्याबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. मॉलमध्ये आग लागल्याने धूर झाला. त्यामुळे सहा महिला मॉलच्या गच्चीवर पळाल्या. त्यात तीन महिला जखमी झाल्या. त्या महिलांना अग्निशामन विभागाच्या कर्मचार्‍यांनी हायड्रोलिक शिडीच्या सहाय्याने खाली आणण्यात आले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रूग्णवाहिकेच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ऑक्सिजन व पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. यावेळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली.

मॉक ड्रिलमध्ये लिडींग फायरमन श्याम राऊत, अर्जुन फोरजे, इक्बाल शेख, फायरमन शिवाजी फुगट, भिमाशंकर खोडे, इसाक शेख, दिनेश लासुरे, विजय शिंदे, चालक ज्ञानेश्वर दराडे, डी. डी. इंगळे, देशमुख यांच्यसह सिटी सेंटर मॉलचे कर्मचारीही सहभागी झाले होते.

First Published on: April 15, 2019 8:45 PM
Exit mobile version