निवडणूक शाखेतर्फे विधानसभेची रंगीत तालीम

निवडणूक शाखेतर्फे विधानसभेची रंगीत तालीम

विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्‍या मतदानयंत्रांवर अभिरूप मतदान (मॉक पोल) घेण्यात येत आहे. पुढील तीन दिवस हे प्रात्यक्षिक सुरू राहाार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले होते. प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर छोटया पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांनी याकडे पाठ फिरवल्याचेच दिसून आले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्याने जिल्हा निवडणूक शाखेची या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मिळालेल्या मतदानयंत्रांचे प्रथमस्तरीय तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. या मतदानयंत्रांबाबत मनामध्ये कोणतीही शंका राहू नये, मतदानयंत्र व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री पटावी, यासाठी निवडणूक शाखेने अभिरूप मतदान प्रक्रिया मंगळवारपासून सुरू केली आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्‍या एकूण मतदानयंत्रांपैकी पाच टक्के मतदान यंत्रांवर अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन टक्के मतदान यंत्रांवर एक हजार मतदान, एक टक्के मतदानयंत्रावर बाराशे मतदान आणि दोन टक्के मतदानयंत्रांवर पाचशे मतदान, याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

अभिरूप मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण झालेले मतदान व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांची मोजणी करून खात्री करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर विरोधकांनी ईव्हीएम हटाव मोहीम सुरू केली. विधानसभा निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी होत आहे. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूका ईव्हीएमवरच घेण्याचा निर्णय घेतल्याने ही प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी आता मॉक पोलव्दारे ईव्हीएमविषयी राजकिय पक्षांची शंका कुशंकांचे निराकरण केले जात आहे मात्र राजकिय पक्षांनी या अभिरूप मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवत उदासिनता दाखवुन दिली.

राष्ट्रवादीची हरकत

राष्ट्रवादी काँग्रेसने ईव्हीमएला विरोध दर्शवला. आज अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसच्या गोदामात झालेल्या मॉक पोल वेळी सर्व राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होेते. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा आग्रह धरला मात्र सदरचा निर्णय हा स्थानिक स्तरावर नव्हे तर निवडणूक आयोग घेत असते असे अधिकार्‍यांनी सांगत पदाधिकार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र पदाधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते अखेर पदाधिकार्‍यांनी प्रक्रियेत सहभागी न होता निघून जाणेच पसंत केल्याचे समजते.

First Published on: September 4, 2019 10:55 PM
Exit mobile version