वाढता वाढता वाढे महायुतीतील इच्छुक

वाढता वाढता वाढे महायुतीतील इच्छुक
लोकसभा निवडणूक जाहीर होऊन १५ दिवस उलटले असताना अजूनही महायुतीतील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. महत्वाचे म्हणजे, एरवी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनंतरच उमेदवार कोण असेल याचा अंदाज येत असतो. यंदा प्रथमच १५ दिवसांनंतरही नवनवीन इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे यात उमेदवारी कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला मिळते, याची उत्सुकता लागलेली आहे. यावर गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्याबाबत अजूनही विचार सुरु आहे. त्यात छगन भुजबळ यांचीही ‘एन्ट्री’ झाल्याने उमेदवारीतील चुरस वाढली आहे. परंतु, भुजबळ यांना मराठा समाजाचा मोठा विरोध असल्याने मराठा समाजाच्या तीन इच्छुकांच्या नावांचे सर्व्हेक्षण आता सुरु झाले आहे. यात पूर्व मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. अनुक्रमे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या इच्छुकांशी स्पर्धा करण्यासाठी सोमवारी (दि. ८) नव्याने आणखी इच्छुकांचा ‘जन्म’ झाला आहे. यात भाजपकडून यापूर्वीपासूनच इच्छुक असलेले महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर यांच्या नावांची चर्चा यापूर्वीपासूनच आहे. तर शांतीगिरी महाराजांचेही नाव भाजपच्या इच्छुकांच्या  समाविष्ठ झाले आहे. यात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे नाव नव्याने चर्चेत आले आहे. यापूर्वी भाजपमधून प्रयत्न केल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली होती. महाविकासने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता त्यांचे नाव पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून घेतले जात आहे. त्यांच्या नावाची शिफारस दस्तुरखुद्द छगन भुजबळ यांनीच पक्ष श्रेष्ठींकडे केल्याचे बोलले जाते. तसेच विधानपरिषदेसाठी नशिब आजमावलेले अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचे नावे अजित पवार गोटातून चर्चेत आले आहे. महापालिका नगरसेवक ते भुजबळांच्या उमेदवाराविरोधात विधानपरिषद निवडणूक लढविणारा म्हणून शिवाजी सहाणेंकडे पाहिले जाते. भाजपचे राज्य प्रवक्ता, भाजप उद्योग आघाडीचे राज्य प्रभारी तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सदस्य असलेले प्रदीप पेशकार हे देखील पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले सिडकोतील अनिल जाधव हे गेल्या 35 वर्षापासून भाजपशी संलग्न आहे, त्यांनाही तिकीटाची अपेक्षा आहे. महापौरपदाची कारकिर्द गाजविणारे दशरथ पाटील यांच्याही नावाची चर्चा उमेदवारीसाठी होत आहे. त्यांनी सध्या अपक्ष उमेदवारी करण्याचीही तयारी केली आहे.
First Published on: April 9, 2024 5:30 AM
Exit mobile version