सहा महिन्याच्या चिमुकलीला आईने सोडले बेवारस

सहा महिन्याच्या चिमुकलीला आईने सोडले बेवारस

सहा महिन्याच्या चिमुकलीला आईने सोडले बेवारस

साईबाबा मंदिरालगत गुरुस्थानजवळ एका अज्ञात मातेने सहा महिन्याच्या चिमुकलीला बेवारस सोडून देण्याची धक्कादायक घटना घडली. साईबाबा संस्थानच्या महिला सुरक्षा कर्मचार्‍यांनी या चिमुरडीला ताब्यात घेतले असून सदर महिला सीसीटीव्हीत कैद झाली असून शिर्डी पोलीस या महिलेचा शोध घेत आहे.

शुक्रवारी (३१ मे) सकाळी साईबाबांची आरती झाल्यानंतर समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. यानंतर समाधीचे दर्शन घेऊन गुरुस्थान येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीचा फायदा उचलत एका केसरी रंगाची साडी परिधान केलेल्या अज्ञात महिलेने सहा महिन्याची चिमुकलीस याठिकाणी बेवारस टाकून दिले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे निदर्शनास आले असून या घटनेबाबत शहरात खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आणि आईची ममता हेलावून टाकणारी घटना घडली. जमिनीवर रडत असलेली चिमुरडी पाहून भाविकांनी सुरक्षारक्षकास याची कल्पना दिली. यावेळी संस्थानच्या सुरक्षा विभागाने तातडीने महिला कर्मचार्‍याची नियुक्ती करुन या चिमुकली ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले, झालेली घटना चुकीची आणि निंदनीय असून या प्रकाराबाबत शिर्डी पोलिसांना कळवले असून अज्ञात महिलेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या ही सहा महिन्याची चिमुकली संस्थानच्या रुग्णालयात दाखल केली असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या घटनेबद्दल शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चिमुरडीला अहमदनगर महिला बालकल्याण समीतीकडे सपुर्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: June 1, 2019 7:42 AM
Exit mobile version