मालेगाव मनपा आयुक्त करोनाबाधित

मालेगाव मनपा आयुक्त करोनाबाधित

प्रातिनिधीक फोटो

मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट झाले असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी (दि.१३) मालेगाव पाहणी दौर्‍यावर असतानाच येथील महापालिकेचे आयुक्त करोनाबाधित असल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आयुक्त हे आरोग्यमंत्र्यांच्या दौर्‍यात सहभागी झाले होते. याचवेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी तातडीने बैठकीतून काढता पाय घेतला. आयुक्तच करोनाबाधित झाल्याचे समजल्यामुळे त्यांच्या संपर्कातील अधिकार्‍यांचीही चिंता वाढली आहे.

मालेगावात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असून करोनाबाधित रुग्णांचा आकडा सहाशेच्या उंबरठ्यावर आहे. मालेगावात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, मालेगावात रुग्ण वाढत आहे. करोनाबाधित रुग्णांमध्ये नागरिकांसह पोलीस, डॉक्टर, परिचारिकांसह प्रशसकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. मालेगाव महापालिकेच्या स्वच्छता सहायक आयुक्तानंतर नुकताच पदभार स्वीकारलेले आयुक्त करोनाबाधित असल्याचे बुधवारी (दि.१३) निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, मालेगावी आरोग्यमंत्री राजेश टोपे पाहणी दौर्‍यावर आले असता त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिका आयुक्त, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

First Published on: May 13, 2020 6:44 PM
Exit mobile version