अनधिकृत होर्डिंग विरोधात महानगरपालिका ‘अॅक्शन’ मोडवर

अनधिकृत होर्डिंग विरोधात महानगरपालिका ‘अॅक्शन’ मोडवर

नाशिक : शहरातील अनधिकृत फलेक्स आणि होर्डिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना नाशिक महापालिकेने याविरोधात आता मोहिम हाती घेतली आहे. नवीन नाशिक परिसरातील पाथर्डी व इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून विनापरवानगी तसेच कोणताही जाहिरात कर न भरता व्यवसायिकांनी लावलेले अनधिकृत बॅनर,डिजिटल बोर्ड व फलक मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आले.

महापालिकेला कर न भरता अनधिकृत फलक, डिजिटल बोर्ड, बॅनर लावणे बेकायदेशीर असून या बेकायदेशीर फलकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. कमोदनगर येथून अतिक्रमण मोहिमेस सुरुवात झाली. राणेनगर, गोविंदनगर, कलानगर, रथचक्र चौक व साईनाथ नगर या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यात व रस्त्यालगत विनापरवानगी लावण्यात आलेले स्टॅन्ड बोर्ड, डिजिटल बोर्ड, बॅनर आदी साहित्य अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आले. या कारवाईत तब्बल दोनशेहून अधिक बोर्ड जप्त करण्यात आले. महापालिका आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार,उपायुक्त करुणा डहाळे यांच्या सूचनेनुसार नाशिक पुर्व चे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, जुबेर सय्यद आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांचा फौजफाटा तसेच पंचवटी, पूर्व तसेच पश्चिम विभागाच्या ४ मोठ्या वाहनांसह मोठा फौज फाटा ठेवण्यात आला होता.

First Published on: January 31, 2023 6:02 PM
Exit mobile version