महापालिकेचा गलथान कारभार : १० कोटींचे एमआयआर मशीन धूळखात; रुग्णांना जाच

महापालिकेचा गलथान कारभार : १० कोटींचे एमआयआर मशीन धूळखात; रुग्णांना जाच

नाशिक : नाशिकरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब रुग्णालयात बसविण्यात आलेले सुमारे १० कोटींचे अत्याधुनिक एमआयआर मशीन महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे सिटी स्कॅन यंत्रणादेखील केवळ एचआरसीटीपुरताच मर्यादित राहीली आहे. परिणामी रुग्णांना तपासण्यांसाठी खासगी लॅब्जमध्ये जावे लागते आणि त्यापोटी मोठा आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागतो आहे. दरम्यान, यासंदर्भात मनसेने वारंवार निवेदन देऊनही महापालिकेने याप्रश्नी डोळेझाक सुरू ठेवली आहे.

महापालिका आणि संबंधित कंपनी यांतील तांत्रिक वादातून ही महागडी यंत्रणा सुरू झालेली नाही. हा प्रश्न आता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जाते आहे. ठाकरे रुग्णालयात एमआरआय यंत्रणा आणि त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त असल्याने ही यंत्रणा तातडीने सुरू व्हावी, यासाठी मनसेने गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनांद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मनसेने यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देत रुग्णालयातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडेही डोळेझाक केली गेली. त्यानंतर पुन्हा मनसेने ४ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात स्मरणपत्र दिले होते.

पालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला होता.
एवढे होऊनही महापालिका प्रशासनाच्या कारभारात कोणताही बदल झालेला नाही. यंत्रणा बंद असल्याने आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांसह लॅब्जमध्ये जावे लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे या रुग्णांची आर्थिक परवड थांबवण्यासाठी या ठिकाणची यंत्रणा तातडीने सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावी, अशी मागणी मनसेने महापालिका
आयुक्तांकडे केली आहे.

नाशिककरांच्या नावाने महापालिकेने एवढी महागडी यंत्रणा खरेदी करण्याची घाई केली. एवढीच घाई यंत्रणा सुरू करण्यासाठी केली असती तर पालिका प्रशासनाचे प्रयत्न सार्थ ठरले असते. महापालिका प्रशासनाने हा तांत्रिक प्रश्न तातडीने मार्गी लावून यंत्रणा सुरू करावी. अन्यथा, व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.
– श्याम गोहाड, जिल्हाध्यक्ष, मनसे

First Published on: November 29, 2021 9:05 AM
Exit mobile version