Exclusive महापालिकेच्या ऑनलाइन तक्रारींच्या कारभाराची बोंब; हजारो तक्रारी ‘पेंडिंग’

Exclusive महापालिकेच्या ऑनलाइन तक्रारींच्या कारभाराची बोंब; हजारो तक्रारी ‘पेंडिंग’

प्रशांत सूर्यवंशी । नाशिक

गतिमान कारभाराचे दाखले देणार्‍या महापालिका प्रशासनाकडे नाशिककरांच्या तब्बल ४ हजार तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे पालिकेच्या ऑनलाईन कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने निराकरण केल्यानंतर या कार्यवाहीबाबत असमाधानी असलेल्या १ हजारांहून अधिक नागरिकांनी फेरतक्रार केली आहे.

नागरिकांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा व्हावा, या प्रक्रियेत सुसूत्रता यावी आणि तक्रारींकडे डोळेझाक करणार्‍या कामचुकार अधिकार्‍यांवर वचक राहावा, यासाठी महापालिकेने एनएमसी-ई-कनेक्ट हे मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्यात नागरी तक्रारींसाठी स्वतंत्र पर्याय असून, त्याद्वारे वापरकर्त्यांना मुलभूत सुविधा, आरोग्य अशा विविध तक्रारी करता येतात. तसेच, त्याद्वारे तक्रारींची स्थितीदेखील पाहता येते. तक्रार निराकरणाचा कालावधी निश्चित नसला तरीही, एखादी तक्रार कोणत्या अधिकार्‍याकडे किती दिवसांपासून प्रलंबित आहे, याची माहिती दिसत असल्याने अधिकार्‍यांवर वचक असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित तक्रारींची आणि फेरतक्रारींची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातील काही तक्रारी या न्यायप्रविष्ठ मुद्द्यांशी, काही भूसंपादनाशी संबंधित आहेत. मात्र, बहुतांश तक्रारी या महापालिकेने स्वतःहून सोडविण्यासारख्या असतानाही त्या प्रलंबित आहेत. अतिक्रमणांची महापालिकेने स्वतःहून दखल घेणे अपेक्षित असतानाही त्याकडे कानाडोळा करत अभय देणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून तक्रारींकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचीही शक्यता आहे.

अधिकार्‍यांची चालढकल 

कामचुकारपणा करण्याची सवय असलेल्या विभागीय स्तरावरील काही अधिकार्‍यांकडून मुद्दाम तक्रारींकडे डोळेझाक केली जात असल्याचेही पुढे आले आहे. वरीष्ठ स्तरावर तक्रार पुढे पाठवून हात झटकणार्‍या अशा अधिकार्‍यांना यापुढे जाब विचारला जाणार असल्याचे सांगत महापालिका उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी इशारा दिला आहे.

तक्रारींच्या स्वरुपावर तक्रार निराकरणाचा कालावधी अवलंबून असतो. विभागीय स्तरावरुन चालढकल होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला जाईल. : विजयकुमार मुंडे, उपायुक्त, महापालिका

अशी करा तक्रार
  1. एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपवर जाऊन पोस्ट ग्रीव्हन्सवर क्लिक करा
  2. त्यानंतर पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक करा
  3. लोकेशन ऑन करा तक्रारीचे स्वरुप सिलेक्ट करा
  4. डिविजन सिलेक्ट करा
  5. प्रभाग निवडा
  6. लोकशन डिटेल्स टाका
  7. तक्रारीचे स्वरुप लिहा
  8. कॅमेरा चिन्हावर क्लिक करुन फोटो अपलोड करा
  9. त्यानंतर तक्रार सबमिट करा.
First Published on: January 31, 2023 5:29 PM
Exit mobile version