धक्का लागल्याच्या वादातून महापालिका कर्मचार्‍याचा खून

धक्का लागल्याच्या वादातून महापालिका कर्मचार्‍याचा खून

धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने धारदार हत्याने महापालिकेच्या कर्मचार्‍याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रात्री गोदाघाटावर घटना घडली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी फ्रान्सिस जॉन (वय ३६, रा. बोधलेनगर, उपनगर) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. मयूर राजेठ पठाडे, रोहित ऊर्फ दादू सुधाकर पेखळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व मयूर फ्रान्सिस जॉन (रा. अनिकेश अपार्टमेंट, घाडगेनगर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गंगाघाटावरून जात असताना सनीचा एका तरुणाला धक्का लागला. त्यावरून तरुणाचा सनीसोबात वाद झाला होता. त्यानंतर तरुणाची आणि सनीची पुन्हा एका पानटपरीवर भेट झाली. त्यावेळी पुन्हा वाद उफाळून आल्याने दोघांमध्ये झटापट झाली. मंगळवारी (दि. ३०) रात्री सनी व त्याचे मित्र श्रेयस म्हस्के, सागर सोनवणे, अनिकेत सरोदे, रवी चव्हाण, अमोल चव्हाण यांच्यासोबत गोदाघाटावर पार्टी होते. संशयित योगेश साळी, दादू पेखळे, यश भागवत, मयूर पठाडे, गणेश शिरसाठा व आणखी पाच संशयितांच्या टोळक्याने मागील वादाची कुरापत काढून त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी एका संशयितांने धारदार हत्याराने सनीवर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले.

कोणार्कनगरमधून दोघांना अटक

गोदाघाटावरील खूनाची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक घटनास्थळी पोहचले. संशयितांची माहिती मिळताच पथकांनी शोध सुरू केला. त्यावेळी संशयित मयूर राजेठ पठाडे, रोहित ऊर्फ दादू सुधाकर पेखळे हे आडगाव हद्दीतील कोणार्कनगरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार महेश नांदूर्डीकर, सागर कुलकर्णी, कैलास शिंदे, राकेश शिंदे, कुणाल पचलोरे, गोरक्ष साबळे, अनिल मोरे, घनश्याम महाले, युवराज गायकवाड यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तपासाकामी दोघांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

First Published on: May 2, 2024 1:46 PM
Exit mobile version