मुथूट फायनान्स दरोडा : सॅम्युअलची हत्या करणारा दुसरा दरोडेखोर गजाआड

मुथूट फायनान्स दरोडा : सॅम्युअलची हत्या करणारा दुसरा दरोडेखोर गजाआड

मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणी अटक केलेल्या आरोपी समवेत पोलीस पथक

मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोड्याचा प्रयत्न आणि कर्मचारी संजू सॅम्युअल हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दुसर्‍या आरोपीला अटक केली. परमेंदर राजेंद्र सिंग (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सॅम्युअलची तीन गोळ्या घालत हत्या केली होती. पोलिसांनी त्याला उत्तर भारतीयांची वस्ती असलेल्या वडोदरा (सुरतपासून १८ कि.मी.) येथून अटक केली. पोलीस तपासात दरोड्याच्या कृतीत प्रत्यक्ष सहभाग घेणारे सहा व मदत करणारे पाच असा अकरा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांगरे-पाटील म्हणाले, मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूर सिंग (रा.जौनपूर, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. जितेंद्रचा भाऊ आकाश सिंग, परमेंदर सिंग, पप्पू उर्फ अनुज साहू, सुभाष गौड, गुरू यांची नावे आदीच निष्पन्न झाली आहेत. त्यांना मदत करणारे संशयित आरोपी उमेश तिवारी, पप्पू, सुबोध रॉय, मांझी, राहुल, गुरू (पूर्ण नाव समजू शकले नाही) आहेत. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून सर्वजण बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल येथील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

घटनेच्या दिवशी अचानक संजू सॅम्युअलने दरोडेखोरांशी झटापट केली. त्यात परमेंदर सिंगने तीन व आकाश सिंगने दोन गोळ्या झाडून त्याची हत्या केली, अशी कबुली परमेंदर सिंगने दिली आहे. पळून जाताना दिंडोरी येथे नाकाबंदी करताना पोलीस दिसल्याने सर्वांनी तीन दुचाकी रामशेज जवळ सोडून देत आयशर टेम्पोमधून सुरतच्या दिशेने सर्वजण फरार झाल्याचे परमेंदर सिंगच्या चौकशीत उघडकीस आले आहे.

घटनाक्रम

२८ मे – सुरत येथून आकाश सिंगने परमेंदरला दरोड्याची कल्पना दिली.
३ जून – परमेंदर सिंग अवध एक्सप्रेसने सुरतवरून वडोदर्‍याला भावाकडे राहाण्यास आला.
५ जून – दिंडोरी येथे मुख्य सूत्रधार जितेंद्र सिंगची भेट झाली. जितेंद्रने २ हजार रुपये देत परमेंदरला नाशिकच्या बसमध्ये बसवले. तो सायंकाळी ६ वाजता नाशिकमधील कार्बननाका, सातपूरला आला. तेथून सुभाष गौडने त्याला घरी नेले. तेथे राहुल व पप्पू ऊर्फ अनुज साहू होते.
६ जून – रस्ता व मुथूट कार्यालयाची रेकी परमेंदर सिंग व अनुजने केली.
७ जून – गौरव नावाने परमेंदर सिंग मुथूट फायनान्स कार्यालयात रेकी केली.
८ जून – दोन रस्त्यांची रेकी, गुगल मॅपचा अभ्यास करत चार्ट करत रेकी केली.
९ जून – फायनान्स कार्यालय संध्याकाळी सुटण्याच्या वेळेची रेकी केली.
१० जून – राहुल व अनुज साहूने परत रेकी केली.
११ जून – राहुल व परमेंदरने नाशिक-सुरत रस्त्याची रेकी केली.
१२ जून – आकाश सिंग, मांझी, उमेश तिवारी नाशिकमध्ये आले.
१३ जून – उमेश तिवारी व परमेंदरने परत रस्त्याची रेकी केली. दुपारी पुन्हा राहुल व अनुज साहूने रेकी केली.
१४ जून – सकाळी ८ला बाहेर पडले. ९ वाजता मुथूट फायनान्स कार्यालयाच्या पार्किंगमध्ये आले. येथे सर्वांनी पुन्हा एक तास नियोजन केले. ११.३० वाजता अनुज साहू प्रथम कार्यालयात आला. त्याच्या मागे राहुल व तिवारी आले. त्यानंतर मांझी आकाश व परमेंदर खालून वर आले. सर्वांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

६० जीवंत काडतुसे

अकरा जणांनी फेब्रुवारी महिन्यात मुथूट फायनान्स दरोड्याचा कट रचला होता. तो १४ जूनला सर्वजणांनी अंमलात आणला. सर्वजणांनी नियोजनबद्ध दरोडा टाकला. दरोड्यासाटी आयशर टेम्पो, तीन दुचाकी, सहा पिस्तुल, ६० जीवंत काडतुसे यांचा वापर केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

चार महिने आधी रेकी

दरोडेखोरांना शहरातील रस्त्यांची, सीसीटीव्ही, नाकाबंदीची रेकी केली होती. श्रमिकनगर, सातपूर येथील सुभाष गौड याच्या घरी सर्व दरोडेखोर राहाण्यास आले. दोघेजण अदलून-बदलून मुथूट फायनान्स कार्यालयातील कर्मचारी, कार्यालय सुरू होण्याची व बंद होण्याची वेळ, गुजरातकडे जाणारे मुख्य व उपरस्ते यांची प्रत्यक्ष दुचाकीवरून येत रेकी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

बक्षीस रक्कम सॅम्युअलच्या कुटुंबियांना

सूत्रधार व सॅम्युअलला गोळ्या घालणार्‍या दरोडेखोरांच्या मुसक्या आवाळणार्‍या गुन्हे शाखेच्या तीन पथकांना प्रत्येकी ७० हजार असे २ लाख १० हजारांचे बक्षीस नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या बक्षिसाची सर्व रक्कम संजू सॅम्युअलच्या कुटुंबियांना देणार येईल, अशी घोषणा गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांनी केली.

तुरुंगातून हलली सूत्रे

प्रसिद्ध सुबोधसिंग (बिहार) याच्यावर उत्तरप्रदेश, बिहार राज्यांमध्ये १५ गुन्हे दाखल आहेत. तो आता तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्याच्यासाठी सर्वजण काम करीत आहेत. त्याच्या सांगण्यावरून नाशिकमधील मुथूट फायनान्स कार्यालयावर सर्वांनी सशस्त्र दरोडा टाकला. सुबोधसिंग हस्तकांमार्फत देशभर बँका, फायनान्स कंपनी व इतर मोठ्या आस्थापना या ठिकाणी दरोडा टाकत आहे. परमेंदर सिंग हा त्याचा मुख्य हस्तक असल्याचे तपासत उघडकीस आले आहे.

हत्येखोर शिक्षकाचा मुलगा

सॅम्युअलला गोळ्या घालणारा परमेंदर सिंग हा शिक्षकाचा मुलगा आहे. त्याला चार भाऊ, चार बहिणी आहेत. त्याचे तीन भाऊ सुरतमध्ये साड्यांच्या कंपनीत नोकरीला आहेत. दरोड्याच्या आधी तो सुरतमध्ये भावांकडे मुक्कामाला आल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्यावर सात दरोडा व तीन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. दरोड्यासाठी त्याने गौरव नाव धारण केले होते. लग्नात व शेतजमिनीवरून वाद झाला की तो गोळीबार करायचा.

माजी मंत्र्याच्या घरी आश्रय

परमेंदर सिंग हा बिहारमधील एका माजी मंत्र्याच्या घरी आश्रयाला होता. त्याची तीन वर्षापूर्वी मनीष राय गुन्हेगाराशी ओळख झाली. सहा महिन्यांपूर्वी त्याची मुख्य सूत्रधाराचा सख्खा भाऊ आकाश याच्याशी ओळख झाली. या दरोड्यातून १२ कोटींची लूट मिळणार असून त्यातील एक कोटी रुपये परमिंदरला देण्याचे प्रलोभन सुबोध सिंगने दाखवले होते.

First Published on: June 25, 2019 3:34 PM
Exit mobile version