मविप्र निवडणूक : श्रीराम शेटे यांचा कोणत्या पॅनलला पाठिंबा; यांचे अर्ज दाखल

मविप्र निवडणूक : श्रीराम शेटे यांचा कोणत्या पॅनलला पाठिंबा; यांचे अर्ज दाखल

नाशिक : मविप्र संस्थेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांची भूमिक काय असेल याविषयी सभासदांमध्ये उत्सुकता लागलेली असताना त्यांनी प्रगती पॅनलला पाठिंबा जाहीर केला. प्रगती पॅनलच्या मेळाव्यात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मविप्र संस्थेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मी नाराज असल्याची वल्गना केली गेली. पण मी कुठलीही उमेदवारी मागितली नाही. नीलिमा पवार आजारी होत्या. त्यांना दोनवेळा कोरोना झाला. त्यामुळे त्यांनीच मला आग्रह केला की, यापुढे निवडणूक लढवणे मला शक्य होणार नाही. तुम्हीच या संस्थेची धुरा सांभाळा. यावर मी स्पष्टपणे नकार दिला होता. मला कादवा कारखान्याचे कामकाज असल्यामुळे संस्थेसाठी वेळ देवू शकत नसल्याचे मी त्यांना सांगितले.

नीलिमा पवार यांनी शरद पवारांकडे आग्रह धरल्यानंतर मी सरचिटणीसपदासाठी तयार झालो. पण निफाड तालुक्याबाहेरचा सरचिटणीस कधी झालेला नाही. त्यामुळे आमच्यात कधी मतभेद नव्हते आणि राहणारही नाहीत, असा खुलासा श्रीराम शेटे यांनी केला. ते पुढे म्हणाले, कर्मवीरांनी प्रचंड कष्टाने संस्था उभी केली असून संस्थेत केजी टू पीजी शिक्षणाची सुविधा निर्माण केली आहे. डॉ. वसंतराव पवारांनी स्पर्धेच्या युगात संस्था टिकवून संस्थेचा आर्थिक स्तर उंचावला.
संस्था ही समाजाची ओळख असून संस्थेच्या विकासासाठी निलीमा पवार यांच्या आपण कायम सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. मविप्र संस्था ही समाजाची आहे. त्यामुळे सभासदांनी संस्थेचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना साथ देण्याचे आवाहन केले. दरम्यान, श्रीराम शेटे यांनी आपली भूमिका प्रगती पॅनलच्या बाजूने व्यक्त केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तर सभासदांनी घोषणांचा पाऊस पाडला.

यांचे अर्ज दाखल

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवारी (दि.१०) सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलच्या संभाव्य उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

First Published on: August 11, 2022 2:28 PM
Exit mobile version