नारपार, मांजरपाडा, वांझुळपाडा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित

नारपार, मांजरपाडा, वांझुळपाडा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गुजरातने पाणी पळविले या मुद्दयावर राजकारण करण्यात आले. मात्र, ना गुजरातने पाणी पळविले ना महाराष्ट्राला पाणी मिळाले. प्रकल्पाअभावी पाणी अखेर समुद्राला मिळाले. पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने दिंडोरीत आदिवासींचे स्थलांतर हा कळीचा मुद्दा बनलेला आहे.

स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर बंधारे बांधणे, इरिगेशन, शेती वाढविणे गरजेचे आहे. मात्र यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने नारपार, दमणगंगा, मांजरपाडा हे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पेठ आणि सुरगाणा या भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून गोदावरी आणि गिरणा नद्या वाहतात. चेरापुंजीनंतर या नद्यांच्या खोर्‍यांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रकल्पाअभावी हे पाणी वाहून जाते. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात पळवते अशी ओरड कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेते करीत आहेत. मात्र हे पाणी ना गुजराथला जाते ना महाराष्ट्राला मिळते, प्रकल्पाअभावी हे पाणी समुद्राला मिळते.

त्यामुळे प्रशांत हिरे, सुदाम पेठे, ए.टी. पवार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले नारपार, वांझुळपाडा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे प्रकल्प पूर्ण झाले तर मराठवाडा, खान्देश सुजलाम सुफलाम होतील. कळवण, येवला, नांदगाव येथील पाणीप्रश्न सुटेल. दिंडोरीत ओझरखेड, पुणेगाव, पालखेड, करंजवण, वाघाड, तीसगाव अशी एकूण 7 धरणे आहेत. मात्र ही धरणे दिंडोरीची तहान न भागविता इतर जिल्ह्यांची तहान भागवितात त्यामुळे आजही दिंडोरी तालुका तहानलेलाच आहे.

First Published on: April 9, 2024 2:20 PM
Exit mobile version