परदेशी पाहुण्यांसाठी नाशिक ’योगा हब’

परदेशी पाहुण्यांसाठी नाशिक ’योगा हब’

निसर्गाच्या कुशीत त्र्यंबकेश्वर भागात उभे राहिलेले योग विद्या धामचे गुरुकूल.

मेडिकल, इंजिनीअरिंग अशा उच्च शिक्षणासाठी परदेशी धाव घेणार्‍या भारतीयांची संख्या कमी नाही. मात्र, याच गतीने नाशिकमधील योग विद्या धाममध्ये दरवर्षी ३०० व्यक्ती योगशास्त्राचे धडे घेण्यासाठी येत असल्याचे सांगितल्यास चटकन कुणाचा विश्वास बसणार नाही. आजवर या संस्थेने भारतात १७ हजार, तर परदेशात ५ हजारांहून अधिक योगशिक्षक घडवले आहेत.

नाशिकमध्ये कॉलेजरोडवरील योग विद्याधामची पायाभरणी झाली ती १९७९ मध्ये. तेव्हापासून आजवर लाखो व्यक्तींना या संस्थेने योगाचे धडे दिले आहेत. योग प्रशिक्षणासाठी लाभणारा प्रतिसाद पाहता, संस्थेने त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य जागेत योग प्रशिक्षणाचे निवासी केंद्र सुरू केले. या दोन्हीही ठिकाणी रुग्णांसाठी योगसंजीवन हा एक महिन्याचे शिबिर होते. निरोगी व्यक्तींसाठी योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध आणि योग प्रवीण या चार टप्प्यात योगाशास्त्राचे धडे दिले जातात. या अभ्यासक्रमांना केंद्र सरकारच्या आयुष विभागाची मान्यता असल्याने, प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना करिअरसाठी त्याचा मोठा उपयोग होत असल्याचे योग विद्या गुरुकुलचे अध्यक्ष विश्वास मंडलिक सांगतात. संस्थेचे महाराष्ट्रात ४० सेंटर्स कार्यरत असून, महाराष्ट्राबाहेर आसाममध्येही योगशास्त्राचे धडे दिले जातात.

परदेशातही संस्थेचे सेंटर्स

संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील केंद्रात प्रत्येक वर्षी १० निवासी वर्ग होत असतात. त्या प्रत्येक वर्गात किमान ३० व्यक्ती या परदेशी असतात. परदेशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन संस्थेने सिंगापूर, थायलंड, कझाकिस्तान येथेही योगशास्त्र प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत.

३३ हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

नाशिकरोड येथे संस्थेचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्रात प्रत्येक महिन्याला किमान ७० ते ७५ रुग्ण दाखल होत असतात. आजवर तब्बल ३३ हजार रुग्ण या केंद्रातून ठणठणीत होऊन गेले आहेत. डॉ. विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रात एड्स, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांवर प्रभावी उपचार केले जातात.

खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे

गेल्या ३० दशकांपासून योगसाधनेच्या वाटेवर चालत असताना आम्ही आहाराकडेदेखील तितकेच लक्ष देत आलो आहोत. योगशास्त्राचे धडे देताना आम्ही संतुलित आणि शुद्ध आहाराचेही महत्त्व पटवून देतो. योगशास्त्राचे महत्त्व आता जगभराला समजल्याने खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. – विश्वास मंडलिक, अध्यक्ष, योग विद्या गुरुकूल

First Published on: June 21, 2019 11:13 AM
Exit mobile version