महानगर इम्पॅक्ट : नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश

महानगर इम्पॅक्ट : नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश

नाशिक:जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या ऑपरेशनसाठी वापरात येणारी सामुग्री अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रिय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.

जिल्हाभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान येत असताना प्रत्यक्षात अतिशय निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय उपकरणे खरेदी करुन रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा ‘उद्योग’ जिल्हा रुग्णालयात सुरू असल्याचा प्रकार ‘आपलं महानगर’ने उघडकीस आणला. सिव्हिलमधील एका शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णासाठी वापरलेले स्क्रू आणि मेटल्स चक्क तुटल्याचा धक्कादायक घटनेनंतर येथील अनेक प्रकरणे उघडकीस येऊ लागली. परंतु, या सर्व प्रकरणांची केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दखल घेतली असून जिल्हा शासकीय रुग्णालयाची त्रयस्त समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही कारण्यात येणार आहे.

रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात येते. या पैशांतून रुग्णांकरिता लागणारी औषधे आणि उपकरणे यांची खरेदी केली जाते. कागदोपत्री निविदा काढून ब्रॅण्डेड कंपनीकडून ही खरेदी दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात उपकरणांचा दर्जा बघता संबंधित कंपनी ब्रॅण्डेड नसल्याचा संशय येतो.

जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑपरेशनसाठी वापरात येणारी सामग्री ही उत्कृष्ट दर्जाची असायला हवी. यात काही त्रृटी राहिलेल्या आहेत का, याविषयी त्रयस्त समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.
– डॉ. भारती पवार, केंद्रिय राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंबकल्याण

 

First Published on: September 15, 2022 6:01 PM
Exit mobile version