नाशिक-पुणे खड्ड्यांचा महामार्ग; टायर फुटून वाढले अपघात

नाशिक-पुणे खड्ड्यांचा महामार्ग; टायर फुटून वाढले अपघात

संगमनेर : तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक कारचे टायर फुटले असून, काही कार पंक्चरही झाल्या आहेत. तर काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, महामार्गावर खड्डे की खड्ड्यात महामार्ग अशी अवस्था महामार्गाची झाली आहे.

पावसामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते रायतेवाडी फाटादरम्यान ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून माती टाकून काही खड्डे बुजवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवातही झाली. मात्र, पुन्हा रिमझिम पावसामुळे खड्डे उघडे पडले आहेत. बोटा बाह्यवळणजवळील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शनिवारी सकाळी या खड्ड्यांमध्ये एक कार जोरदार आदळली. त्यावेळी पाठीमागून आलेली भरधाव पुढील कारला धडकली.

रविवारी रात्री डोळासणे येथे खड्ड्यांमध्ये आदळून दोन ते तीन कारचे टायर फुटले होते. तर काही कार पंक्चरही झाल्या होत्या. सोमवारी महामार्गावरील खड्ड्यांमध्येे कार आदळून टायर फुटले असून, अनेक कारचे मॅकव्हीलही निघून गेल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, खड्ड्यांमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने जोराने आदळत आहेत. शिवाय, महामार्गालगतचे पथदिवेही गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.त् यामुळे सध्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डे की खड्ड्यात महामार्ग अशीच अवस्था पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे.

खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको : ग्रामस्थ

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून वाहनांचे टायर फुटत असून, अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे चालक त्रस्त झाले असल्यामुळे संबंधित विभागाने खड्डे बुजवावेत, अन्यथा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

First Published on: August 17, 2022 2:02 PM
Exit mobile version