स्मार्ट सिटीची ट्रायल रन नाशिककरांसाठी ठरली डोकेदुखी

स्मार्ट सिटीची ट्रायल रन नाशिककरांसाठी ठरली डोकेदुखी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या नावाखाली अगोदरच शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने व्यावसायिक आणि नागरिकांची डोकेदुखी ठरली असताना शनिवारपासून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत जंक्शन साकारण्यात येत आहे. याकरीता शनिवारपासून ट्रायल रन सुरू करण्यात आली आहे. मात्र, या ट्रायल रनमुळे परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने स्मार्ट कारभाराने नाशिककरांची डोकेदुखी वाढवली.

नाशिक महापालिका स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेड अर्थात स्मार्ट सिटी कंपनीकडून गावठाण विकास योजनेतून चौकांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवार कारंजा परिसरात जंक्शन साकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्यासाठी वाहतुकीचा ट्रायल रन घेतला जात आहे. यासाठी सकाळी याठिकाणी गोण्या टाकण्यात आल्या. मात्र, अगोरदच हा मार्ग अरूंद असल्याने या जंक्शनसाठी टाकलेल्या गोण्यांमुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड मेहेर सिग्नल पुढे अशोक स्तंभ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

स्थानिकांचा विरोध

यापूर्वी दहीपूल परिरात स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण रस्ता खादून ठेवल्याने येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. आता महात्मा गांधी रोड परिसरात विरुद्ध दिशेला स्मार्ट सिटीचे उर्वरित कामे सुरु आहे. त्यामुळे दुकानाजवळची पार्किंग रस्त्यावर आली आहे. दोन्ही दिशेने चारचाकी वाहने आली तर संपूर्ण रस्ता तिथेच थांबतो. यापूर्वी अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गाच्या कामामुळे नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर उतरावे लागले. आता रविवार कारंजा परिसरात ट्रायल रन सुरू आहे. मूळात रविवार कारंजा हा वर्दळीचा परिसर आहे. तसेच येथे दुकाने, शाळा, रिक्षा स्टॅन्ड, बस स्टॉप असल्याने येथे मोठी गर्दी असते, त्यामुळे येथे वाहन पार्किंगचा प्रश्न असताना जंक्शन उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

यशवंत मंडई येथे पार्किंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त गेडाम यांनी पाच वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. परंतु हे काम स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आले. हा प्रकल्प बीओटीवर करण्याचे सांगण्यात आले मात्र प्रकल्पाची किंमत ७० कोटींवर गेल्याने हा प्रकल्प पुढे जाउ शकला नाही. त्यामुळे आधी यशवंत मंडई येथे बहुमजली पार्किंग स्थळ विकसित करण्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे.
– सचिन भोसले, शहर समन्वयक, मनसे

रविवार कारंजा ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. मुळात येथील बाजारपेठांमधील पार्किंगचा प्रश्न जैसे थे आहे. असे असताना पुन्हा हे काम सुरू केल्यास नागरिक येणार कसे? स्मार्ट सिटीचा कारभार जनतेने पाहिला आहे. एकही काम मुदतीत पूर्ण होत नाही. जर रविवार कारंजाचे काम झाले नाही, तर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागले अन् व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसेल.
मयूर काळे, व्यावसायिक

यश मंडई येथे बहुमजली पार्किंग स्थळ विकसित करण्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आधी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. स्मार्ट सिटी कामास आमचा विरोध नाही, परंतु सर्व कामे अर्धवट ठेवून नवीन कामे सुरू केली जातात. अगोदर पार्किंगची व्यवस्था करा.. नंतर हे काम करण्यात यावे.
-नरेश पारख, व्यावसायिक

रविवार कारंजा परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत जंक्शन उभारण्यात येणार आहे. याकरीता ही ट्रायल रन घेण्यात येत आहे. दहा दिवस ही ट्रायल रन घेण्यात येईल. यात वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन स्थानिकांची मतेही विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे.
-सुमंत मोरे,मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कार्पोरेशन

First Published on: December 12, 2021 8:00 AM
Exit mobile version