नाशिक-सूरत विमानसेवा येत्या नोव्हेंबरपासून

नाशिक-सूरत विमानसेवा येत्या नोव्हेंबरपासून

ओझर विमानतळ येथून १ नोव्हेंबरपासून नाशिक-सूरत विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीमार्फत सोमवार आणि शुक्रवार असे आठवडयातून दोन दिवस ही सेवा देण्यात येणार आहे. नाशिक-सूरत सेवेसाठी स्टार एअर कंपनीने पुढाकार घेतला आहे. सध्या नाशिकहून मुंबई, पुणे, बंगळुरू अशी विमानसेवा सुरू आहे. मात्र, सुरतसाठी अशी सोय नव्हती. ही सेवा सुरू करा, अशी व्यापार्‍यांची मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे.

सध्या आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून तिच्या फेर्‍या वाढवल्या जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नाशिक सुरत ही सेवा थेट देण्यात येणार नसून नाशिक बेळगाव सुरत अशी ही सेवा असणार आहे असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता कोरोना प्रवासाबाबतचे निर्बंधही शिथिल होत आहे. त्यात दिल्लीमध्ये टाइम स्लॉट मिळाल्यानंतर नाशिक-दिल्ली विमानसेवा ही लवकरच सुरू होणार आहे. डबघाईस आलेल्या जेट एअरवेजसोबत इंडिगो कंपनीनेही त्यासाठी तयारी केली आहे.

दिल्ली दूर नही!

नाशिक येथून सध्या पुणे, बेळगाव, अहमदाबादला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सोबतच स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू आहे. डबघाईस आलेल्या जेट एअरवेजनेही 22 सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची नाशिक-दिल्ली सेवा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

इंडिगोही शर्यतीत

नाशिककरांनी दिल्लीच्या विमानसेवेला उदंड प्रतिसाद दिला होता. पुणे, बेळगाव, अहमदाबादपेक्षाही या विमानात प्रवासी संख्या जास्त होती. नाशिकहून रेल्वेने अडीच-तीन तासांमध्ये मुंबई गाठता येते. मात्र, दिल्लीची तसे नाही. जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद पडली होती. त्यामुळे दुसर्‍या कंपनीने नाशिक-दिल्ली विमान सुरू करावे, यासाठी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर उडाण योजनेंतर्गत इंडिगो कंपनीला नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरू करण्यात परवानगी मिळाली. येत्या 25 सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, दिल्ली विमानतळावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी कंपनीला अजून वेळ मिळाली नव्हता. नागरी उड्डाण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर इंडिगो विमानाचा मार्ग मोकळा होणार आहे.

First Published on: October 29, 2021 7:57 AM
Exit mobile version