नाशिकची ‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन’ आशियात पंधरावी

नाशिकची ‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन’ आशियात पंधरावी

नाशिक : आशिया खंडातील आठ देशांमध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या, मध्यम व लघु क्षेत्रातील कंपन्यांमधील वातावरणाच्या आधारे त्यांना ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ या संस्थेतर्फे गौरविण्यात येते. नाशिकच्या ‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन’ या कंपनीला आशियामधील 15 वे सर्वोत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून गौरविले आहे. आशिया खंडातील 20 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांनी आपली मते नोंदवली आहेत. देशातील दोन कंपन्यांना हा बहुमान मिळाला असून, ‘ईएसडीएस’च्या निमित्ताने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘ग्रेट प्लेस टू वर्क’ने आशियातील 25 कंपन्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात देशातील दोन कंपन्यांचा समावेश आहे. ‘ईएसडीएस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि समूह व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी याप्रसंगी म्हणाले, गेल्या वर्षी आमची कंपनी सर्वोत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून भारतात अव्वल ठरली होती. यंदा संपूर्ण आशियात ती 15 व्या स्थानावर आली आहे. ‘ईएसडीएस’च्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये आमच्या प्रत्येक कर्मचार्‍याचा असलेला दृढ विश्वास, या मूल्यांचे समर्थन करण्याची अतूट क्षमता यांमुळेच आम्हाला हे गौरवाचे स्थान पटकावता आले आहे. करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील व्यवसायांसाठी सध्याचा काळ कठीण आहे. अशा परिस्थितीतही ‘ईएसडीएस’च्या कर्मचार्‍यांची एकत्रित शक्ती अबाधित राहिली आहे. एकमेकांना मदत करण्याचे मार्ग या स्थितीतही आम्हाला सापडले आहेत. करोनाचा विषाणू याबाबत निष्प्रभ ठरला आहे. ‘ईएसडीएस’चा प्रत्येक ग्राहक आणि ‘ईएसडीएसियन’च्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आम्ही दृढपणे उभे राहत आहोत, असेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊन संपल्यानंत्तर या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

First Published on: April 15, 2020 6:06 PM
Exit mobile version