अन्यथा महापौरांच्या बंगल्यासमोर खड्डे खोदणार

अन्यथा महापौरांच्या बंगल्यासमोर खड्डे खोदणार

नाशिक । शहरातील सर्व खड्डे पुढील पंधरा दिवसात बुजवा अन्यथा रामायण बंगला, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे करू :असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महापालिका सत्ताधार्‍यांना दिला.

स्मार्ट सिटीचा टेंभा मिरविणार्‍या स्मार्ट नाशिकची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहे. शहरातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहे. जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने खुद्द भाजपा आमदार यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. महापालिका सत्ताधार्‍यांचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिक मध्ये आले असताना महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यात माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. परंतु पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जात सर्वत्र चिखल झाला. युवक राष्ट्रवादीच्या वतीने महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. परंतु सुस्त सत्ताधार्‍यांनी याकडे लक्ष दिले नाही.

दिवाळीचा सण जवळ येत असल्याने नाशिककर खरेदीकरिता घराबाहेर पडत आहे. परंतु त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्यांना प्रचंड त्रास होत असल्याने कमरेचे व मणक्याचे आजार उद्भवू लागले आहे. महापौर, विभाग सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी कुठलेही काम केलेले नसून यांची येत्या पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास युवक राष्ट्रवादी रामायण बंगला, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे करणार आहे. तसेच या आंदोलनानंतरही खड्डे न बुजविल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवत जाणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले

First Published on: October 14, 2021 6:15 AM
Exit mobile version