इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणे-घेणे नसून पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईस भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केला आहे.

एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत. यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारमुळेच पेट्रोलने प्रति लिटरला किंमतीचे शतक पार केले असून डिझेल देखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई महंगाई कि मार अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव १०४ रुपये तर डिझेलचे भाव ९६ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, डॉ. जयंत पवार, राजेंद्र भोसले, अरुण देवरे, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाट आदींची भाषणे झाली. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी यावेळी केली. यावेळी विजय पवार, राजेंद्र भोसले, डॉ. जयंत पवार, अरुण देवरे, यशवंत शिरसाट आदी उपस्थित होते.

First Published on: June 25, 2021 1:18 PM
Exit mobile version