गोदाकाठी 24 डिसेंबरला रंगणार मिस्तुरा फेस्ट

गोदाकाठी 24 डिसेंबरला रंगणार मिस्तुरा फेस्ट

नाशिक : स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, कलाकारांनी नव्या युगाशी सांगड घालावी यादृष्टीने शौर्य फाऊंडेशनतर्फे मिस्तुरा आर्ट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ओपन आर्ट ही यंदाची फेस्टची संकल्पना आहे. २४ व २५ डिसेंबर रोजी गोदापार्क येथे हा फेस्ट रंगणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे हा फेस्ट झाला नाही. मात्र, यंदा पुन्हा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत नाशिककरांना भेट देता येणार आहे. या फेस्टमध्ये कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, हॅण्डमेड दागिने व खाद्य पदार्थ यांसारखे स्टॉल पाहायला मिळतील. याशिवाय नाशिकच्या नामांकित कलाकारांनी व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती व इन्स्टॉलेशन उभ्या केल्या जाणार आहेत. तसेच, कलाप्रेमींसाठी विविध फोटो प्रदर्शन व चित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रामुख्याने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार्‍या या प्रदर्शनाचे आयोजनदेखील विद्यार्थी करत आहेत.

शहरातील हजारो विद्यार्थ्यांचा एकत्रित सहभाग ही मिस्तुराची विशेष ओळख बनत चालल्याचे आयोजकांनी सांगितले. याशिवाय म्युझिकल नाईट, ढोल पथक, लाईव्ह पेंटिंग, रॉक बँड, क्लासिकल आणि लोकसंगीत मिस्तुरा आर्ट फेस्टिव्हलच्या अनुषंगाने सादर केल्या जाणार आहेत. फेस्टिवलला प्रवेश मोफत आहे. तसेच, अनेक मिनी गेम्स, वर्कशॉप, लकी ड्रॉ व विविध कलाप्रदर्शन येथे होणार आहे.

 

First Published on: December 11, 2022 8:57 AM
Exit mobile version