इराणवरुन नाशिकला आलेल्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह

इराणवरुन नाशिकला आलेल्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह

करोना व्हायरस चाचणी

करोना आजाराने जगभर धुमाकूळ घातला आहे. चीन देश करोना आजाराचा केंद्रबिंदू असला तरी भारतात तीन करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या करोनासदृश्य रुग्णाचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असताना इराणवरुन आलेला ३५ वर्षीय तरुणाने सर्दी व ताप आल्याची तक्रार केल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने रुग्णालयाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले असता मंगळवारी (दि.३)त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला.

२६ फेब्रुवारी रोजी इटलीहून आलेल्या विद्यार्थ्यावर जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या वैद्यकीय अहवालात कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. इराणवरुन आलेल्या तरुणाने सर्दी व ताप आल्याची तक्रार केल्याने मनपा वैद्यकीय विभागातर्फे तपासणी केली. त्यानंतर खबरदारी म्हणून तात्काळ जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. मंगळवारी (दि.३) त्याचे रिपोर्ट प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले असून त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनाचा संशय असला, तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

नियमित १४ दिवस तपासणी

जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. खबरदारी म्हणून इराणवरुन आलेल्या तरुणास उपचारार्थ कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय विभाग नियमित १४ दिवस तपासणी करीत आहेत. कोणी तक्रार केल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.
डॉ. निखील सैंदाणे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक

First Published on: March 3, 2020 5:27 PM
Exit mobile version