आता पालिकेचेही टोइंग; जॉगिंग ट्रॅकवरील १६ गाड्या जप्त

आता पालिकेचेही टोइंग; जॉगिंग ट्रॅकवरील १६ गाड्या जप्त

जॉगिंग ट्रॅकवरील वाहने जप्त करताना महापालिकेचे पथक.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृतपणे पार्क केलेल्या १६ दुचाकी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात जप्त केल्या. दंड आकारणीनंतर या दुचाकी सोडण्याची भूमिका पालिकेने जाहीर केली. स्थानिकांच्या तक्रारींनंतर पालिकेने ही कारवाई केली.

नाशिक पूर्व विभागातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर अनेक वाहनचालक व काही टवाळखोर आपली वाहने पार्क करुन निघून जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांसह जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालिकेकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने संयुक्त विशेष मोहीम हाती घेत पार्क केलेली वाहने जप्त केली. अनेक व्यक्ती आपली वाहने लावून अन्य कामांसाठी निघून जातात. संपूर्ण दिवसभर वाहने पार्क असल्याने, जॉगिंगसाठी येणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महापालिकेने उपलब्ध करुन दिलेली उद्याने, जॉगिंग ट्रॅकमधील अनधिकृत पार्किंगवर सातत्याने कारवाई केली जावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

First Published on: April 21, 2019 7:50 AM
Exit mobile version