हॉटेल व्यवसायाला ४ वाजेचेच बंधन, तूर्तास सवलत नाही : भुजबळ

हॉटेल व्यवसायाला ४ वाजेचेच बंधन, तूर्तास सवलत नाही : भुजबळ

राज्य शासनाने निर्बंध शिथिल करतांना हॉटेल्स, रेस्टॉरंटला मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा दिली असून शासनाच्या या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिक एकवटले आहेत. नाशिकमध्येही रेस्टॉरंट चालकांनी आंदोलन केले. मात्र हॉटेल रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यास संचारबंदी नियमांचा भंग होईल, तसेच हॉटेलच्या नावाखाली नागरीक गर्दी करतील त्यामुळे तुर्तास तरी हॉटेल्स, रेस्टॉरंटसला वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय होणे अशक्य असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने मॉल्स आणि दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र हॉटेल व्यवसायाला या निर्बंधातून कोणतीही सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटकांना रात्री ११ पर्यंत वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा हॉटेल्स अ‍ॅन्ड बार असोसिएशनने केली आहे तसेच रेस्टॉरंट चालकांनी दोनच दिवसांपूर्वी शहरात आंदोलन केले. लवकरच सर्व व्यावसायिक पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, इतर दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत मुभा दिली असतांना हॉटेल्सला रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून देणे तुर्तास शक्य नाही.

हॉटेल्समध्ये जाण्याच्या बहाण्याने नागरीक रस्त्यावर गर्दी करतील. त्यामुळे संचारबंदी नियमाचा भंग होईल. हॉटेलमध्ये खाद्य पदार्थ खाण्यासाठी तर मास्क काढावे लागतील त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटकांचाही शासन सहानुभुमीपुर्वक विचार करत आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी धोका टळलेला नाही त्यामुळे याबाबत मुख्यमंत्रीच याबाबत योग्य तो निर्णय घेतील असेही ते म्हणाले. मंदिरांबाबतही स्थानिक स्तरावर कोणताही निर्णय घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: August 8, 2021 9:56 PM
Exit mobile version