यंदा शाळांची शुल्कवाढ नाही!

यंदा शाळांची शुल्कवाढ नाही!

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी शैक्षणिक शुल्कवाढ करु नये, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नाशिक स्कूल असोसिएशनने यंदा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 15 दिवसांत नाशिकमधील शाळा ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचे निश्चित केले आहे. प्रत्यक्ष शाळा मात्र 15 जुलैनंतरची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार आहे.
शाळांना उद्भवणार्‍या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नाशिक स्कूल असोसिएशनने नुकतीच बैठक घेतली. यात आगामी शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडरविषयी चर्चा करुन काही निर्णय घेतले आहेत. शासन निर्णयाप्रमाणे शाळांना दर दोन वर्षांनी 15 टक्के शुल्कवाढ करण्याचे अधिकार आहेत. त्यादृष्टीने विचार केल्यास 2018 मध्ये नाशिकमधील इंग्रजी माध्यम शाळांनी शुल्कवाढ केली होती. चालू शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करण्याचा निर्णयही झाला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच शाळा लॉकडाऊन झाल्या. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणार नसल्याचे दुजोरा नाशिक स्कूल असोसिएशनने दिला आहे. मूळात राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नाशिक स्कूल असोसिएशनने शुल्कवाढीचा निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्धभवत नसल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. लॉकडाऊन पाचची घोषणा झाल्यामुळे आता ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील सर्व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी शाळा 10 ते 15 जूनपासून ऑनलाईन शिक्षण सुरु करतील. त्यापुढील साधारणत: महिनाभराचा अंदाज घेवून 15 जुलैनंतर शाळा सुरु करता येतील का? याचाही अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. शाळा उशिराने सुरु होत असल्याने स्कूल व्हॅन किंवा खासगी वाहन चालकांना त्यांच्या किलो मिटरप्रमाणे पैसे दिले जातील. त्याचे पैसे पालकांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे जेवढ्या दिवस स्कूल बस चालेल तेवढेच पैसे पालकांना द्यावे लागतील. पालकांना यातून दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने शुल्कवाढ करण्यास मनाई केल्यामुळे शाळांनी शुल्कवाढ करण्याचा प्रश्नच नाही. याउलट ऑनलाईन शिक्षण आम्ही सुरु करत आहोत. तसेच 15 जुलैपासून शाळा सुरु करण्याचा विचारही चालू आहे.
-सचिन जोशी, शिक्षणतज्ज्ञ तथा संचालक इस्पॅलियर स्कूल

First Published on: May 30, 2020 8:42 PM
Exit mobile version