उद्दाम अधिकारी म्हणतात, टँकरसाठी पैसे नाहीत; पाण्यासाठी अनवाणी पायपीट करणार्‍या महिलांची थट्टा

उद्दाम अधिकारी म्हणतात, टँकरसाठी पैसे नाहीत; पाण्यासाठी अनवाणी पायपीट करणार्‍या महिलांची थट्टा

नाशिक : खरंतर, इगतपुरी तालुका महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाच्या तालुक्यातील एक तसेच धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, याठिकानचे उन्हाळ्यातील वास्तव अगदी उलटे आहे. तालुक्यातील अनेक गांव, वाड्या, वस्त्यांवरील नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही प्रशासन पाणी देऊ शकलेल नाही. याबाबत वर्षानुवर्षे आंदोलन, मागणी केली जात आहे. मात्र, तरीही अद्याप लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांच्याकडून त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही.

दरम्यान, पाणीटंचाईचा सामना करणार्‍या गावासाठी टँकरची व्यवस्था करा, अशी विनंती करणार्‍या एल्गार संघटनेच्या पदाधिकार्‍यांना गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी टँकर देण्यासाठी पैसे नाहीत, असे उत्तर दिले. या प्रकारामुळे अधिकार्‍यांची अनास्था चव्हाट्यावर आली.

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या आणि पाड्यांवर भीषण पाणीटंचाईमुळे महिलांवर हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी एल्गार संघटनेचे पदाधिकारी इगतपुरी पंचायत समितीत गटविकास अधिकार्‍यांकडे गेले होते. गावात असलेले टाक्या कोरड्या पडल्याने महिलांना दूर अंतरावरून हंड्यावर हंडे ठेवून पाणी पाणावे लागते. त्यामुळे टँकरद्वारे पाणी आणून ते गावातील टाक्यांमध्ये टाकावे, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. त्यावर गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी टँकरला देण्यासाठी पैसे नाहीत, असे उत्तर दिले. दरवर्षी टँकरचा प्रस्ताव देऊनही तो मंजूर होत नाही. त्यामुळे यावर्षी प्रस्ताव द्यायचा तरी कशासाठी, असा युक्तिवाद अधिकार्‍यांनी केला.

आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. वाळ विहिर येथील ग्रामसेवकांनी टंचाई असताना देखील टँकरचा प्रस्ताव सादर केला नाही. प्रशासनातील अधिकार्‍यांच्या अशा कारभारामुळे ग्रामस्थ मात्र चांगलेच संतप्त झाले आहेत.

First Published on: May 29, 2023 2:47 PM
Exit mobile version