स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात

स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

सरकारचे धोरण स्वत:च्या प्रसिद्धीचे आहे. पाच वर्षात जाहिरातींवर २४५ कोटी खर्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ महिन्यांमध्ये ९२ वेळा परदेशात गेले. त्यासाठी दोन हजार कोटी खर्च झाला. पण मोदी हात हलवत आले. आता प्रचाराला मुददेच नसल्याने कौटुंबिक आरोप-प्रत्यारोप ते करत आहेत. वर्ध्याला माझ्याबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल बोलतात. सांगतात काय तर, आमच्या घरात भांडणे आहेत. अरे स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात, अशी टिका करत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टिकेचा समाचार घेतला.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथील सभेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, लोकांचा समज होता की, माझे आणि मोदींचे चांगले संबंध आहेत, होतेही. ते मुख्यमंत्री होते. मी देशाचा कृषिमंत्री होतो. देशातला कोणताही मुख्यमंत्री शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन आला की मदत करण्याची भूमिका होती.मोदी कुठं तरी बोलले की, मी शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आलो. माझ्या बोटाला धरून राजकारणात आले हे खरं आहे. शेजारील राज्य आहे म्हणून मदत केली. मी शेतीमालाला भाव वाढविण्याची भूमिका पार्लमेंटमध्ये मांडली होती. त्यानंतर प्रधानमंत्री झाल्यावर मागणी योग्य नसल्याचे बोलले. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. रात्रीच नोटाबंदी केली. अख्खा देश रांगेत उभा राहिला. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी ही बाई देश सोडून जाईल असे लोक म्हणत होते. मात्र सोनिया गांधी उभ्या राहिल्या. देशासाठी योगदान दिले. तरीही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत. आतापर्यंत गांधी परिवाराला शिव्या घातल्या. आता माझा नंबर. वर्ध्याला माझ्याबद्दल बोलले असे सांगत पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील लुंग्यापुंग्याच्या टीकेला मोजत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

काय गडी भारीये…

एके दिवशी मोदी कुठंतरी म्हणाले, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. ‘काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडलं.

First Published on: April 5, 2019 4:23 PM
Exit mobile version