प्लास्टिकच्या थ्रीडी पणत्यांमुळे कुंभारांचे ‘दिवाळे’

प्लास्टिकच्या थ्रीडी पणत्यांमुळे कुंभारांचे ‘दिवाळे’

प्रमोद उगले । नाशिक

दिवाळीचा सण अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. मात्र, प्रकाशोत्सवाचा हा सण प्रकाशमान करणार्‍या कुंभारांच्या दुकानांना आजही अपेक्षित प्रतिसाद नाही. बाजारात प्लास्टिकच्या थ्रीडी रिफ्लेशन पणत्या दाखल झाल्याने मातीच्या पणत्यांची मागणी कमी झाली आहे.

आजपासून पाच ते दहा वर्षांपूर्वी दिवाळीला संपर्ण अंगणभर मातीच्या पणत्या लावल्या जायच्या आणि याच पणत्या आणि इतर साहित्यामुळे कुंभार व्यावसायिकांची दिवाळी गोड व्हायची. परंतु, गेल्या काही वर्षांपासून बाजारात प्लास्टिकच्या पणत्या दाखल होऊ लागल्या लागल्या आहेत. मातीच्या पणत्यांच्या तुलनेत प्लास्टिकच्या पणत्या स्वस्त असल्याने ग्राहक त्यांच्याकडे वळत आहेत. याचाच परिपाक म्हणून पारंपरिक कुंभार व्यवसाय धोक्यात आला येवून त्यांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे. पणत्या, महालक्ष्मीच्या मूर्ती, धुपाटणे तसेच, लहान मुलींसाठी मातीची खेळणी तयार करून कुंभार आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, आता तर चिनी मातीच्या पणत्या आणि महालक्ष्मीच्या मूर्ती मातीऐवजी पीओपीच्या आल्याने त्या अधिक सुबक दिसत आहेत. यामुळे ग्राहकांनी मातीच्या महालक्ष्मी खरेदी करण्यास उदासिनता दाखविली आहे. त्यामुळे आमची दिवाळी गोड कशी होणार अशी खंत कुंभार व्यावसायिकांनी आपलं महानगरशी बोलताना
व्यक्त केली आहे.

पारंपरिक व्यवसाय बंद करावा लागण्याची भीती 

सद्यस्थितीत मातीची खेळणी बंद झाली असून, त्याच्या तुलनेत प्लास्टिकची खेळणी स्वस्त व टिकाऊ असल्याने ग्राहक तिला पसंत देत आहेत. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर होवू लागल्याने मातीची मडकी कमी होत आहेत. पुढील काही वर्ष अशीच स्थिती राहिल्यास हा व्यवसाय बंद होवून कुंभार व्यावसाय पूर्णपणे लुप्त होईल, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षाच्या तुलनेत ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद आहे. पावसामुळे तयार मालावर केलेली पॉलिश वारंवार खराब होत असल्याने निर्मितीचा खर्च वाढला आहे. त्याशिवाय प्लास्टिकच्या पणत्यामुळेही विक्री मंदावली आहे. : दिनेश कुंभार, विक्रेते

First Published on: October 13, 2022 12:26 PM
Exit mobile version