अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्याने नुकसान

अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्याने नुकसान

देवळा तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर आला.

देवळ्यासह येवला तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसला. त्यात काही शेतकऱ्यांचे पॉली हाऊसचे नुकसान झाले तर काही प्रमाणावर पिकांनाही फटका बसला.

देवळा तालुक्यात शुक्रवारी (१२ एप्रिल) वादळी वार्‍यामुळे चिंचवे येथील एका घराचे पत्र्याचे छत उडाले तर अन्य ठिकाणी पीकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तसेच, मेशी येथील मिलिंद राणे यांनी २० लाखांचे कर्ज घेऊन बांधलेले पॉली हाऊस व शेडनेटचे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर वादळी वारा सुटला होता. यात चिंचवे येथील गुलाब साहेबराव कुवर यांच्या घराचे पत्र्याचे छत उडाल्याने कुवर यांचा घरातील सर्व संसार उघड्यावर पडला. तसेच, काही ठिकाणी कांदा रोप तयार करण्यासाठी लावलेले कांद्याचे डोंगळे भुईसपाट झाले. आंब्यांच्या कैर्‍या वार्‍याने पडल्याने नुकसान झाले. गुरांना साठवून ठेवलेल्या चारा काही ठिकाणी उडून गेल्याने देखील शेतकर्‍यांचे नुकसान झाले. वादळी वार्‍यानंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. शेतातून काढलेला कांदा अद्याप काही ठिकाणी साठवणूक सुरू असल्याने शेतात व घराजवळ पडलेला कांदा व गुरांचा चारा झाकण्यासाठी मोठी धावपळ शेतकर्‍याला करावी लागली.

मोसमी पावसाने शेतकरी हवालदिल

येवला तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमध्ये पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रायते ते एरंडगाव दरम्यान वादळ वार्‍यासह अर्धा तास जोरदार हजेरी लावली. पाटोदा, धुळगाव, बाभुळगावसह चिंचोडी, जळगाव नेऊर, नेवरगाव भागात वादळामुळे झाडे उन्मळून पडली. काही घरावरचे पत्रेदेखील उडाले. विखरणी येथील शिवाजी शेलार यांची काकडीचे खांब जमीनदोस्त होऊन लाखो रूपयाचे नुकसान झाले. काही ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी काढून ठेवला होता त्याचेही नुकसान झाल्याचे कळते. परंतु, काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.

First Published on: April 13, 2019 11:25 PM
Exit mobile version