आता परवानगी देऊनच टाका साहेब !

आता परवानगी देऊनच टाका साहेब !

नाशिक : पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत डीजेच्या विषयावरुन अनेकांनी पोलीस आयुक्तांना साकडे घातले. यावेळी नाशिकचे प्रसिद्ध ‘डीजेवाले नाना’ म्हणजेच दंडे हनुमान मित्रमंडळाचे गजानन शेलार यांनीही आपल्या खास शैलीत पोलीस आयुक्तांना डीजे वाजवण्यास परवानगी देण्याची मागणी केली. ‘आम्ही यापूर्वीही नियम पाळले, आताही पाळू. डीजेच्याही मर्यादा आम्ही पाळतोच. कोरोनात खूप मर्यादा होत्या. त्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला. आता मुख्यमंत्री साहेबांनीच परवानगी दिली आहे. त्यामुळे तुम्हीही आता डीजेला परवानगी देऊनच टाका साहेब!’ अशी विनंती करताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर नानांनी स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याची मागणी करतानाच नवीन कामांना या काळात परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, गणेश मंडळ पदाधिकार्‍यांसह सदस्यांनीही डीजेची मागणी केली असता ‘नानांनी’ पुन्हा आपल्या शैलीत उत्तर दिले. ‘अरे बाबा, डीजेमुळे तर मला किती त्रास झाला, अजूनही केसेस चालूये, पण हरकत नाही, केसेसच पाहून घेऊ. पण यंदा दणक्यातच गणेशोत्सव करू’ असे म्हणत नानांनी पुन्हा एकदा नाशकातील गणेशोत्सवात डीजे वाजवूच असे संकेत दिले.

अवजड वाहने, बी.डी. भालेकर मैदानाचा प्रश्न

गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या समस्या आणि मागण्या पोलीस आयुक्त, तसेच महापालिकेच्या विभागीय अधिकार्‍यांपुढे मांडल्या. माजी महापौर विनायक पांडे यांनी नाशकात गणेशमूर्तींच्या उंचींविषयी येणार्‍या अडचणी मांडल्या. यानंतर बबलू परदेशी यांनी गणेश मंडळांना येणार्‍या अडचणी आणि विसर्जन मिरवणुकीविषयीच्या मागण्या मांडल्या. जुन्या नाशकात येणार्‍या अवजड वाहनांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. यात भद्रकालीचा राजा मित्रमंडळाचे चेतन शेलार यांनी सायंकाळच्या सुमारास गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी अशा अवजड वाहनांना बंदी करण्याची महत्त्वाची सूचना मांडली. तर श्याम गोहाड यांनीही एक खिडकी योजना राबवून गणेशभक्तांची होणारी गैरसोय दूर करण्याची विनंती केली. सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि मंडळ पदाधिकार्‍यांना योग्य प्रतिसाद मिळावा, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर गणेश बर्वे यांनी शहरातील बी.डी. भालेकर मैदानावरील दुरवस्थेबाबत तक्रार केली. याठिकाणी पडून असलेल्या पाईपांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त करताना लवकरात लवकर हे पाईप हटवण्याची मागणी केली. तसेच गणेशभक्तांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर व्हाव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी देवळाली कॅम्प, म्हसरूळ, सातपूर, नाशिकरोड तसेच सिडको परिसरातील गणेश मंडळ पदाधिकार्‍यांनीदेखील आपल्या महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

सामंजस्याने प्रश्न सोडवू

 डीजेची मागणी गणेशभक्तांनी करणे स्वाभाविक आहे. कायद्याचे पालन करत न्यायालयाने घालून दिलेली बंधने पाळणेही गरजेचय. शिवाय वरिष्ठांकडून काही आदेश आले तर निश्चितच नाशिकमध्येही डीजे वाजवण्यास पूर्णत: परवानगी दिली जाईल, तसेच शहरातील मूर्ती विक्रीच्या ठिकाणी बारकोड स्कॅनिंग करून काही कर्मचारी नियुक्त करून वाहतूक कोंडी होणार नाही,  दरम्यान मंडळांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असून, विसर्जन मिरवणुकीतही पोलिसांच्या नियमांचे पालन करणे गरजेचे : जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त  

 

नाशकात डीजे वाजणारच, याची खात्री !

पोलीस आयुक्तांनी अनेक चांगल्या सूचना केल्या असून, डीजे बाबत कायद्याची बंधने असल्याने त्यांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडून निश्चितच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आयुक्तही चांगले आहेत. ते लवकरच परवानगी देतील. त्यामुळे नाशकात डीजे वाजेलच, अशी खात्री  : समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ 

 

First Published on: August 19, 2022 2:49 PM
Exit mobile version