धान्य वितरणात कालबाह्य ई-पॉस मशीनचा अडसर

धान्य वितरणात कालबाह्य ई-पॉस मशीनचा अडसर

रेशन कार्ड , Ration Card

नाशिक : सध्याचा जमाना फोर-जी, फाईव्ह-जीचा असला तरीही रेशन वितरणासाठी वापरण्यात येणार्‍या ई-पॉस मशीन मात्र टू-जी आणि थ्री-जीच्या युगातील असल्याने धान्य वितरणात अडचणी निर्माण होत आहे. परिणामी दुकानदारांसह शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले असून, ई-पॉस मशीन्स अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रेशन धान्यातील काळाबाजाराला चाप लावण्यासाठी शासनाने ऑनलाईन धान्य वितरणाची प्रणाली विकसित केली. बायोमेट्रीकद्वारे धान्य वितरण सुरू केले. त्यासाठी ई-पॉस मशीनची जोड दिली. मात्र, काळानुरुप हे मशीन बदलणे किंवा अद्ययावत करणे गरजेचे असताना तसे झालेच नाही. त्यामुळे फोरजी, फाईव्ह जीच्या युगात २जी आणि ३ जी इंटरनेच स्पीडला सपोर्ट करणार्‍या ई-पॉसद्वारेच धान्यचे वाटप ग्राहकांना करावे लागत आहे.

त्यामुळेच अडचणी वाढल्या आहेत. आधीच रेशनचे धान्य प्रत्येक महिन्यात दुकानदारांकडेच विलंबाने येते. अन् त्याची ग्राहकांना वितरणाची मुदतही अनेकदा संपुष्टात आलेली असते. त्यामुळे वेळेत धान्याचे वितरण न झाल्यास ते धान्य तसेच परत करावे लागते किंवा पुढील महिन्याच्या अवांटनात त्याचा समावेश करावे लागतो. त्यामुळे शेवटच्याच दिवसांत बहुतांश वेळा धान्य येते अन् ग्राहकांचीही त्याच वेळी धान्य घेण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे मशीन्सला नेटवर्क मिळत नाही.

आताही नेटवर्क मिळत नसल्याने धान्य वितरण करताना मोठ्या अडचणींचा सामना दुकानदारांना करावा लागत आहे. ग्राहकही त्यामुळे त्रस्त झाला असून, दुकानदारांशी त्यांचे वादही होतात. त्यामुळे त्वरीत या मशीनची समस्या निकाली काढण्यासाठी यंत्रणेकडून उपाययोजना होणे आवश्यक आहे.

First Published on: February 5, 2022 8:17 AM
Exit mobile version