ओझर नगरपरिषेदेला अखेर कारभारी मिळाला

ओझर नगरपरिषेदेला अखेर कारभारी मिळाला

ओझर : ओझर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे सहायक आयुक्त किरण देशमुख यांची नेमणूक करुन त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपवली आहे.

दिंडोरीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या नियुक्तीचा आदेश आधी देण्यात आला होता, मात्र तो प्रशासकीय कारणास्तव रद्द करून किरण देशमुख यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. ओझर नगरपरिषदेला मुख्याधिकारी नसल्याने अनेक प्रश्न कायम होते. त्यासाठी अनेकांनी मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे हे दोन वेळा प्रशासक म्हणून नेमण्यात आले.

त्यांच्याकडे ओझरचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. मात्र, त्यांचा कार्यकाळ हा नेहमीच आंदोलने निवेदन आणि संघर्षमय राहिला आहे. सक्षम अधिकार्‍याअभावी अनेक समस्या कायम आहेत. जनतेच्या समस्या नवनियुक्त मुख्याधिकारी सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरी समस्यांचा वेढा शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत आहे. कचरा उघड्यावर टाकला जात असून, दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आजार बळावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकार्‍यांची गरज होती. मुख्याधिकारी कोणते प्रश्न मार्गी लावणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

घंटागाडी सेवा थोड्याफार प्रमाणात चालू असली तरीही कचर्‍याच्या नियोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कचरा रहिवाशी भागातच टाकला जात असून, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यात कचरा जाळला जातो. यामुळे धुराचे लोट गावात येतात. यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

– विनोद विधाते, रहिवाशी

ओझर शहर व उपनगरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सर्वत्र मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
– दीपक पाटील, रहिवाशी

पाणी असूनदेखील पाणी टंचाईला जनतेला सामोरे जावे लागत आहे. जागोजागी जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ओझर शहराचा वाढलेला विस्तार पाहता नवीन जलवाहिनी टाकण्याची गरज आहे.
– राजू भडके, नागरिक

 

First Published on: April 1, 2022 9:41 AM
Exit mobile version