कांदा रडवणार, दोन दिवसातच २८ टक्क्यांनी वाढला दर

कांदा रडवणार, दोन दिवसातच २८ टक्क्यांनी वाढला दर

केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी दिलेल्या परवानगीमुळे लासलगाव घाऊक बाजारात कांद्याचा दर सलग दुसऱ्या दिवशीही चांगलाच कडाडला. प्रति क्विंटल २५०० रूपये इतका भाव सलग दुसऱ्या दिवशी मिळाला आहे. केंद्र सरकाने कांद्याच्या सर्व प्रकारच्या जातीसाठी असणारी निर्यातीची बंदी मागे घेतली. परिणामी कांद्याच्या भावात सातत्याने वाढ पहायला मिळाली. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी) ने एका नोटीफिरेशनच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे. लासलगाव बाजारात कांद्याचा दर जवळपास २८ टक्क्यांनी वाढला आहे. सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी मागे घेतल्याचा हा परिणाम तत्काळ समोर आलेला आहे.

केंद्र सरकारने १ जानेवारीपासूनच कांद्याच्या सर्व प्रकारच्या जातींवरील बंदी हटवली आहे. कांद्याचा सातत्याने पडणारा भाव पाहता केंद्राकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. डीजीएफटीने एका नोटीफिकेशनच्या माध्यमातून याबाबतची माहिती जाहीर केली होती. लासलगाव मंडईत कांद्याचा दर हा गेल्या काही दिवसांपासून क्विंटलमागे सरासरी १९५१ रूपये असा स्थिरावला होता. पण या भावानंतर कांद्याच्या दरात मात्र सातत्याने वाढ पहायला मिळाली आहे, असे लासलगाव एपीएमसी सेक्रेटरी नरेंद्र वढवणे यांनी स्पष्ट केले आहे. प्रति क्विंटल सरासरी २४०० रूपये असा दर वाढला होता, त्यानंतर २५०० रूपयापर्यंत हा दर गेला. सरासरी २८ टक्क्यांची ही वाढ झाली आहे. दिल्लीतही कांद्याचा भाव २५ टक्के ते ४२ टक्के असा वाढला. जो कांद्याचा दर ३५ रूपये किलो होता तोच दर आता ५० रूपये किलो असा झाला आहे.

सप्टेंबर महिन्यातच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली. कांद्याच्या किंमतीना आळा बसावा तसेच स्थानिक बाजारपेठेत कांद्याची उपलब्धतता वाढावी या उद्देशानेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली. काही राज्यात कांद्याच्या पिकाचे झालेले नुकसान पाहता, ही बंदी आणण्यात आली होती. भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक ही तीन राज्ये कांदा उत्पादनातील मोठी राज्ये आहेत. भारताकडून प्रामुख्याने नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या देशात कांद्याची निर्यात होते.

 

First Published on: December 31, 2020 12:29 PM
Exit mobile version