उद्योग, आस्थापनांना ऑनलाईन परवानगी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

उद्योग, आस्थापनांना ऑनलाईन परवानगी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

प्रातिंनिधिक फोटो

प्रतिनिधी । नाशिक

करोना विषाणूच्या संसर्गाने संपुर्ण अर्थव्यवस्थेचा गाडा रूतलेलात असतांना अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्राने पाउल उचलले आहे. याच धर्तीवर आता नाशिकमध्येही येत्या सोमवार (दि. २०) पासून काही उद्योग, आस्थापनांना लॉकडाउनमध्ये शिथिलता देत सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याकरीता जिल्हा प्रशासनानेही पाउलं उचलली असून या उद्योगांच्या परवानगीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून ऑनलाईन परवानगी दिली जाणार आहे. याकरीता व्यवस्था करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

गेल्या २१ दिवसांपासून उद्योगगाडा ठप्प आहे. जनजीवन थांबले आहे. हातावर पोटपाणी असलेल्या मजुरांचे देखील हाल होत आहे. मात्र आता करोनाचा फारसा प्रभाव नसलेले क्षेत्र वगळून इतर भागात सरकारच्या अटी, शर्थींचे पालन करून उद्योगांना परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. आपल्याला आता २० एप्रिलपासून दुसर्‍या टप्प्याला सुरवात करावयाची आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ८० ते ९० टक्के भूभाग हा आजही कोरोनामुक्त आहे. त्यामुळे तेथील निर्बंध काहीअंशी शिथील करण्यासाठी शासनामार्फत मार्गदर्शक सुचना देखील प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. त्यामुळे आजतागायत संपुर्ण लॉकडाऊन असलेला जो भूभाग कोरोना प्रभावित नाही, त्याठिकाणी काही प्रमाणात मोकळीक देण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियम, अटी व विविध परवानग्यांची आवश्यकता असणार आहे. या कालावधीतील नियम, अटी व परवानग्या कशा मिळतील याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांमार्फत यासाठी हेल्पलाईन सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुकर पध्दतीने परवानग्या मिळतील याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. उद्योग, व्यवसायांना ज्या कारणास्तव परवानगी देण्यात आली त्याच कारणास्तव त्याचा उपयोग होतो आहे किंवा नाही याबाबत मोबाईल ट्रॅकिंगव्दारे पडताळणीही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्हयात १७ कंटेनमेंट झोन

सुरवातीला जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पध्दतीने कॉन्टक्ट ट्रेसींग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. आणि आज त्यांच्यामधूनच काही रुग्णांचे पॉझिटीव्ह अहवाल आपल्याला प्राप्त होत आहेत. त्यामुळे इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईनमुळे कोरोनाला चांगल्याप्रकारे अटकाव घालण्यात स्थानिक आरोग्य प्रशासनाला यश आले. आज अखेर कोरोना बाधित ९१ रुग्ण आढळून आले आहेत. रूग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) तयार करण्यात आले आहे. जिल्हयात असे एकूण १७ कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे.

१५ पैकी ४ तालुके प्रभावित

जिल्हयातील १५ पैकी ४ तालुके करोना आजाराने प्रभावित झाली आहे. मात्र ८० टक्के भागात मात्र याचा अटकाव करण्यास प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे ज्या भागात करोनाचा प्रभाव नाही त्या भागातील उद्योगांना शिथीलता देण्यात येणार आहे. झोन निश्चितीबाबत अनेक चर्चा आहेत. यात मालेगाव ‘रेड’ तर नाशिक ‘ऑरेंज’ झोन मध्ये आहे. मात्र हे झोन आरोग्य विभागासाठी बनविण्यात आले आहे. त्याचा उद्योगांशी कोणताही संबध नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

या उद्योगांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार २० एप्रिल नंतर एसईझेड क्षेत्रातील उद्योग, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ज्यात औषध निर्माण, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करणार्या कंपन्या, ग्रामीण भागातील उद्योग, आयटी हार्डवेअर उत्पादन उद्योग, प्रॉडक्शन युनिट्स, ज्यूट उत्पादन उद्योग, पॅकेजिंग मटेरीअलचे उत्पादन करणारे उद्योग, ग्रामीण भागातील फूड प्रोसेससिंग उद्योग, कोळसा व गॅस उत्पादन व संबंधित उद्योगांना सोशल डिस्टन्सिंग, विविध अटी शर्ती व खबरदारीसह उत्पादन सुरू करता येणार आहे

First Published on: April 19, 2020 12:02 PM
Exit mobile version