एका दिवशी वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश!

एका दिवशी वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश!

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशासह परदेशातील विद्यार्थी मोठ्या संख्येनी शिक्षण घेत असल्यामुळे सोशल डिसटन्स राखणे अत्यंत महत्वाचे आहे. येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. त्यातील पहिला बदल म्हणजे महाविद्यालये सुरु होतील तेव्हा केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांना एका दिवशी वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांनी केले.
वुई प्रोफेशनल्स नाशिकच्या वतिने गुरुवारी (दि.7) वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले. ‘करोना नंतरचे शैक्षणिक विश्व आणि शिक्षण पध्दतीत होणारे संभाव्य बदल’ या विषयावर डॉ.करमाळकर यांनी बदल सूचवले. लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करोना हा प्रामुख्याने संसर्गजन्य रोग असल्याने परीक्षा घेताना सामाजिक अंतर राखावे लागेल. डिजिटल शिक्षणावर प्रामुख्याने भर राहणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळीच ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिक्षणाची निवड करता येणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ विचार करत आहे. महाविद्यालयांच्या इमारती, तेथील मुलभूत सुविधा यांवर होणार अफाट खर्च टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हे प्रभावी माध्यम ठरु शकते. त्यामुळे याचा प्रामुख्याने विचार केला जात असून, धोरणात्मक बाबी ठरवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वुई प्रोफेशनल्सचे अध्यक्ष उदय घुगे यांनी केले. कुलगुरुंचा परिचय पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे यांनी करुन दिला. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे, अ‍ॅड.प्रीती भुरे, इस्पॅलियर स्कूलचे प्रमुख सचिन जोशी यांनी कुलगुरुंना प्रश्न विचारले. सूत्रसंचालन वैभव आव्हाड यांनी केले तर प्रशांत आव्हाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन सांगळे, अविनाश आव्हाड, दीपक भुरे, डॉ. राजेंद्र सांगळे यांनी परिश्रम घेतले.

First Published on: May 8, 2020 6:31 PM
Exit mobile version