नाशिकमध्ये पुरुष पर्यटकावर सामूहिक अत्याचार 

नाशिकमध्ये पुरुष पर्यटकावर सामूहिक अत्याचार 

प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिकमध्ये पर्यटनासाठी आलेल्या केरळमधील एका पर्यटकाला रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी तपोवनातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, घटनेमुळे गोदाकाठीच असुरक्षितता आणि गुन्हेगारीसाठी होणारा रिक्षांचा वापर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील एक पर्यटक सुट्टीनिमित्त नाशिकमध्ये आला असून, पंचवटीत एका लॉजवर मुक्कामासाठी थांबला आहे. रमजाननिमित्त जुन्या नाशिकमध्ये बाजार असतो, अशी माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे तो मंगळवारी सायंकाळी दूध बाजार परिसरात फिरण्यासाठी गेला. रात्र झाल्याने मुक्कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी त्याने एका रिक्षाचालकाला पत्ता दाखवत तेथे घेऊन जाण्यास सांगितले. या वेळी पर्यटकासोबत आणखी चौघे दामोदर थिएटरजवळ बसले. काही अंतर गेल्यावर रिक्षाच्या बरोबरीने आणखी चौघे दुचाकीने आले. रस्त्यांबाबत माहिती नसल्याने पर्यटकानेही त्यांना काही विचारले नाही. या सर्वांनी पर्यटकाला तपोवनातील निर्मनुष्य जागी नेत त्याला जबरदस्तीने दारु पाजली. त्याच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पर्यटकाला तेथेच सोडून सर्वजण फरार झाले. या घटनेनंतर भयभीत झालेल्या पर्यटकाने जवळील मंदिरात जात पूजाऱ्याला घटना सांगत मदत मागितली. पुजाऱ्यानेही त्याला घालण्यासाठी कपडे देत मंदिरात आसरा दिला. सकाळी पुजाऱ्याच्या मदतीने पर्यटकाने आडगाव पोलिसांत धाव घेत तक्रार केली.

असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

रामकुंड परिसर व काळाराम मंदिर परिसरात मनमानी रिक्षाभाड्यावरून पर्यटक व रिक्षा चालकांमध्ये वारंवार वाद होत आहेत. चार महिन्यापुर्वी तर एका रिक्षाचाकाने अरेरावी करत पर्यटकास दमदाटी केली. मै गुंडा हूँ, असे रिक्षाचालक पर्यटकास सांगत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चालकास अटकही केली होती. मात्र, त्यानंतरही गुन्हेगारीसाठी होणारा रिक्षांचा वापर आणि पर्यटकांच्या लूटमारीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

First Published on: June 5, 2019 9:05 PM
Exit mobile version