पांजरापोळ : झाडांचे सर्वेक्षण सुरू, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम

पांजरापोळ : झाडांचे सर्वेक्षण सुरू, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम

नाशिक : पांजरापोळ संस्थेची जागा उद्योगांसाठी संपादीत करण्यासाठी भाजप आग्रही असताना पर्यावरणप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा प्रशासनामार्फत पांजरापोळच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पांजरापोळचे विश्वस्त व पर्यावरणप्रेमींमधील बैठकीनंतर सर्वेक्षण सुरू झाले. या बैठकीत पर्यावरणप्रेमींकडून औद्योगिकरणासाठी इतरत्र जागा असून, ऑक्सिजन फॅक्टरीवर घाला घालने चुकीचे असल्याचे मत नोंदवण्यात आले. यासाठी योग्य तो अहवाल अधिकार्‍यांनी सादर करावा, अशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
पांजरापोळनिर्मित जंगलाच्या सर्वेक्षणात या ठिकाणची फळझाडे, औषधी वनस्पती व झाडे यांची नोंदणी केली जाईल.\

जंगलातील वन्यप्राणी, पशु-पक्षी यांची प्रजातीद्वारे नोंदणी होणार आहे. पाण्याचे स्त्रोत, तलावांची क्षमता मोजून अहवाल सादर होणार आहे. परंतु, लाखो झाडे या ठिकाणी असल्याने अवघ्या १० दिवसांत अहवाल देणे शक्य नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आल्याचे समजते.

गुरुवारी दुपारी चारवाजेदरम्यान बैठक घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार नरेश कुमार बहिरम, वनविभागाचे वनपाल विवेक बदाने, महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्यासह जलसंधारण विभाग व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व त्यांचे पथक उपस्थित होते. यानंतर सरकारी वाहनांद्वारे अधिकार्‍यांनी जंगलाची पाहणी करत सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
या जागेत एकूण किती झाडे आहेत, कोणती झाडे आहेत, किती वयाची झाडे आहेत याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. या परिसरात मोर, बिबटे, विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी असल्याचेही सांगितले जाते. त्यांची गणना करून अहवाल दिला जाणार आहे.

आस्वाद घेत निरोप

अधिकार्‍यांनी पांजरापोळला भेट देत मोजणी करण्यासंदर्भात नियोजन, चर्चा व पाहणी केली. पांजरापोळची जंगल सफारीनंतर पांजरापोळ व्यवस्थापनाच्या पाहुणचाराचा आस्वाद घेत पाहणीचा समारोप झाला.

हा तर निव्वळ फार्स

पांजरापोळमधील दोन लाखांवर झाडांची गणना करणे, येथील वन्यजीव, पशु-पक्षी यांच्या प्रजाती व संख्येची मोजणी करणे, उपलब्ध पाणीसाठा व पाणीसाठ्याच्या तलावांचे मोजमाप घेऊन त्यातील पाण्याच्या साठ्याची मोजदाद करून त्याचा अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. मात्र, हा कालावधी अत्यंत तुटपुंजा असून या कामासाठी शंभर माणसे लावली तरी १० दिवसांत झाडांची संख्या, त्यांच्या विविध जाती, फळझाडे, फुलझाडे, औषधी झाडे असे वर्गीकरण करणे, तसेच पशु-पक्षांची गणना करणे अशक्य आहे. त्यामुळे ही मोजदाद करण्याचा निव्वळ फार्स केला जाणार का, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.

First Published on: April 28, 2023 6:22 PM
Exit mobile version