पासपोर्ट मिळाला, मात्र लॅपटॉप, मोबाईल लंपास

पासपोर्ट मिळाला, मात्र लॅपटॉप, मोबाईल लंपास

प्रातिनिधीक फोटो

नाशिकरोड जाणारा प्रवासी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर मित्रासमवेत गप्पा करत असताना दोघांनी त्याचा लॅपटॉप व मोबाईल लांबविला. रेल्वे सुरक्षा बलाने काही तासातच या दोघांना ताब्यात घेतले, परंतू या कालावधीत संशयितांनी लॅपटॉप व मोबाईल लंपास करून बॅग नाशिकरोड येथील न्यूसिंग सायकल मार्टसमोर फेकून दिल्याने त्यातील पासपोर्ट व विमानाचे तिकीटच या प्रवाशाला परत मिळू शकले.

रेल्वेस्थानकावर मोबाईल, पैसे, चिजवस्तू, बॅग आदी गहाळ होण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. बर्‍याचदा प्रवासी बाहेरगावचे असल्याने ते पोलिसांत तक्रार करणे टाळतात व झालेले नुकसान सहन करतात. परंतु रेल्वे सुरक्षा बल आता अधिक सतर्क झाले असून, स्थानकावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मेरठ येथील मोहम्मद शारीख खान हा नाशिकरोड येथील गौरव आहेर यांस भेटून पुढे मुंबईकडे जाण्यासाठी सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान प्लॅटफॉर्मवर उभे होता. या दरम्यान मोहम्मदचे पासपोर्ट व विमान तिकीटासह लॅपटॉप, मोबाईल असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविली. मात्र, रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर काही वेळातच नाशिकरोड स्थानकाच्या आवारातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी मोहम्मद याची बॅग स्टेशनच्या बाहेरील बाजूस आंबेडकर रोडवरील न्यू सिंग सायकल मार्टसमोर फेकून दिल्याची सांगितले. त्यानुसार बॅग शोधण्यात आली. मात्र, यातील लॅपटॉप व मोबाईलची परस्पर विक्री केली असून पासपोर्ट व विमान तिकीटे परत मिळाले. रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी दोघा संशयितांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले असून, मोहम्मद खान व गौरव आहेर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

First Published on: April 9, 2019 8:55 AM
Exit mobile version