आवडीच्या चॅनल्सबाबत ग्राहकांत संभ्रम

आवडीच्या चॅनल्सबाबत ग्राहकांत संभ्रम

प्रातिनिधीक फोटो

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना आपल्या आवडीनूसार वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार ग्राहकांकडून वाहिन्यांनूसार पैसे आकारले जाणार आहेत. ग्राहकांना आवडीचे चॅनेल निवडता यावे याकरिता ट्रायने केबल धोरणास ३१ जानेवारीपर्यंंंत मुदत दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना पसंतीचे चॅनेल निवडून केबल ऑपरेटरला कळवायचे आहे. मात्र या प्रणालीबाबत ग्राहकांना पुरेशी माहितीच मिळत नसल्याने तसेच चॅनेलच्या पॅकेजमध्ये दररोज बदल होत असल्याने केबल सेवेपोटी दरमहा नेमके किती पैसे मोजावे लागणार याचा अंदाज ग्राहकांना आलेला नाही. त्यामुळे ही केबलसेवा महाग ठरणार की स्वस्त होणार, याबद्दल ग्राहकांमध्ये संभ्रम कायम आहे.

ट्रायने १ फेब्रुवारीपासून नव्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी होईल, असे स्पष्ट केले आहे. ७ जानेवारीपर्यंत ३० टक्के, १४ जानेवारीपर्यंत ६० टक्के, २१ जानेवारीपर्यंत १०० टक्के ग्राहकांकडून नवीन नियमांनुसार चॅनेल निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असेही ’ट्राय’ने आदेशात म्हटले आहे.’ट्राय’ने जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार पहिल्या शंभर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी ग्राहकांना १३० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी असे मिळून १५३ रुपये ६० पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र शहरातील केबल ऑपरेटरच या नियमावलीबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. चॅनेलच्या पॅकेजेसचे रोज बदलत असल्याने नेमके कोणत्या दराने पैसे आकारावे, असा प्रश्न केबल व्यावसायिकांसमोर आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे चॅनेल निवडीची प्रक्रिया करावयाची असल्याने ग्राहकांकडून कोर्‍या कागदावर पसंतीचे चॅनलची माहिती भरून घेतली जात असल्याचे काही केबल व्यावसायिकांनी सांगितले. केबल व्यावसायिकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्यात न आल्याने या गोंधळात आणखीनच भर पडली आहे.

 भूर्दंड ग्राहकांना बसणार

ग्रामीण भागात सध्या ८० रुपये ते १५० रुपयांपर्यंत केबल भाडे आकारले जाते, तर शहरी भागात २५० ते ३०० रुपये भाडे आकारले जाते. या भाड्यातच सर्व चॅनेल उपलब्ध होतात. यापुढे मात्र दरात वाढ होऊन प्रत्येक चॅनेलसाठी वेगवेगळे दर आकारले जातील. त्याचा भूर्दंड ग्राहकांना बसणार आहे. नवीन नियमांची योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचली नसल्याने संभ्रम आहे. साहजिकच केबल ऑपरेटर आणि ग्राहकांत वादाची शक्यता आहे. – विनय टांकसाळे, सचिव, केबल ऑपरेटर असोसिएशन,नाशिक

शहरातील केबल व्यवसायाची स्थिती

सेवा देणार्‍या कंपन्यांची संख्या – ३
केबल व्यावसायिकांची संख्या – ५०० ते ६००
केबल ग्राहकांची संख्या – सुमारे अडीच लाख

यावरून वाद

पे चॅनलबाबत ब्रॉडकास्टरला ८० टक्के उत्पन्न, केबल व्यावसायिक तसेच बहुविध यंत्रणा चालक एमएसओ यांना फक्त २० टक्के महसूल हे सुत्र नको. ब्रॉडकास्टरला शुन्य टक्के, एमएसओ ३० टक्के, आणि केबल व्यावसायिकांना ४० टक्के वाटा द्यावा. पे चॅनलमधील जाहिरातीच्या उत्पन्नातील वाटा केबल व्यावसायिकांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

First Published on: January 20, 2019 9:53 PM
Exit mobile version