निर्भया पथकाची कामगिरी; ४० दिवसांत शोधल्या ७४ मुली, महिला

निर्भया पथकाची कामगिरी; ४० दिवसांत शोधल्या ७४ मुली, महिला

नाशिक : येथील पोलीस आयुक्तालयामध्ये २८ मार्च २०१९ रोजी निर्भया पथकाची स्थापना केली गेली. यानंतर गेल्या ८ जुलैला पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची पुनर्रचना झाल्यानंतर कामगिरी उंचावल्याचे दिसून आले आहे. सरकारवाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी ‘आपलं महानगर’ला दिलेल्या माहितीनुसार शहरातील सर्व निर्भया पथकांनी मिळून पुनर्रचनेनंतर अवघ्या ४० दिवसांत हरवलेल्या (मिसिंग) ७४ मुली, तसेच महिलांचा शोध घेण्यात यश मिळवल्याचे दिसून येते. दरम्यान, याशिवाय समुपदेशन आणि तक्रार पेटींमुळे महिलांना आपल्या तक्रारी वा समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवणे शक्य होत असल्याची बाबही सकारात्मकच म्हणावी लागेल.

हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यास प्राधान्य देणे, तसेच ३६३ नुसार दाखल गुन्ह्यांचा निपटारा वेगाने करणे या उद्देशाने निर्भया पथकांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील मिसिंगमधील मुली, महिलांचा शोध घेतला. सद्यस्थितीत दोन सत्रांमध्ये निर्भया पथकाचे कामकाज चालते. यासाठी चारही विभागांसाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक महिला पोलीस अधिकारी, दोन महिला कर्मचारी व एक पुरुष पोलीस कर्मचारी अशा चार सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना मुली, महिलांविषयक दाखल तक्रारींची तसेच मिसिंग गुन्ह्यांची माहिती वेळोवेळी दिली जाते. त्यानुसार तपास केला जाऊन या मुली वा महिलांचा शोध घेतला जात आहे. सद्यस्थितीत निर्भया पथकांची कामगिरी अत्यंत वेगाने सुरू असून, चारही पथकांनी मिळून ८ जुलैपासून आजतागायत ४० दिवसांत हरवलेल्या ७४ मुली व महिलांचा शोध घेतला आहे. निर्भया पथकाच्या अन्य जबाबदार्‍या सांभाळताना या मिसिंगच्या केसेसचा निपटारा करण्याचे काम या पथकांनी केले आहे.

निर्भया

 

गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यादृष्टीने महिला सुरक्षितता, महिलांविषयक गुन्ह्यांच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. महिलांच्या प्रबोधनावर भर दिला जात आहे. विविध शाळा, महाविद्यालयांसह वर्दळीच्या चौकांसह बाजारपेठांमध्ये समुपदेशन केले जात आहे. यात अधिक वाढ केली जाणार आहे. जेणेकरून महिला सुरक्षितता कायम राहिल. महिलांनीही आपल्या तक्रारी, समस्या निर्भयपणे पथकाकडे मांडाव्यात, जेणेकरून त्या सोडवणे शक्य होईल. : दीपाली खन्ना, सहायक पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग

First Published on: August 24, 2022 2:03 PM
Exit mobile version