पिंपळगाव महाविद्यालयास २ सुवर्ण, १ रौप्य पदक

पिंपळगाव महाविद्यालयास २ सुवर्ण, १ रौप्य पदक

पिंपळगाव बसवंत : चंदिगडच्या जगप्रसिद्ध सुकना लेक या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नौकानयन (कॅनोईंग व कयाकिंग) स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालायाच्या एकूण ८ खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. यात २ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावून आपली सुवर्ण पदकांची परंपरा यावर्षीही कायम ठेवताना पुणे विद्यापीठाला कॅनोईंग प्रकारात उपविजेतेपद मिळवून दिले.

कॅनोईंग फोर प्रकारात २०० मीटर अंतराच्या शर्यतीत पहिले सुवर्णपदक पटकाविताना महाविद्यालयाचे खेळाडू धनेश भडांगे, हेमंत हिरे, अरबाज शेख, विशाल गोडे यांच्या चमुने अंतिम फेरीत ३६.५४ सेकंद वेळ नोंदविताना अनुक्रमे पंजाब विद्यापीठ, चंदिगड व केरळ विद्यापीठ यांचा पराभव केला.

दुसरे सुवर्णपदक कॅनोईंग टू प्रकारात ५०० मीटर अंतराच्या शर्यतीत हेमंत हिरे व साद पटेल यांच्या जोडीने अंतिम फेरीत केरळ विद्यापीठ व लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पराभव करतेवेळी १ मिनिट ५८ सेकंद व १० मायक्रोसेकंद अशी वेळ नोंदवली.तिसरे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकले. सर्वात महत्वाच्या समजल्या जाणार्‍या २०० मीटर अंतराच्या कॅनोईंग वन प्रकारच्या अंतिम फेरीत उगवता राष्ट्रीय खेळाडू हेमंत हिरे याला पंजाब विद्यापीठ पतियाळाच्या सिद्धांत सिंगकडून केवळ एका सेकंदाच्या फरकाने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील, प्रा. सागर कर्डक, जितेंद्र कर्डिले, योगेश गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वासराव मोरे, उल्हासराव मोरे यांनी अभिनंदन केले.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम खेळाची परंपरा महाविद्यालयाचे खेळाडू वृद्धिंगत करीत आहेत याचा अभिमान वाटल्याचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे म्हणाले.

First Published on: March 30, 2022 9:33 AM
Exit mobile version