नाशिक बाजार समिती निवडणुकीत पिंगळें विरूद्ध पिंगळे; खुर्चीचा मोह की कौटुंबिक कलह

नाशिक बाजार समिती निवडणुकीत पिंगळें विरूद्ध पिंगळे; खुर्चीचा मोह की कौटुंबिक कलह

नाशिक : नाशिक बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी माजी सभापती देविदास पिंगळे विरूद्ध माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांच्या लढतीची चर्चा सहकारक्षेत्रात सुरू आहे. सध्या नाशिक बाजार समिती निवडणूक अंतिम टप्प्यात आली असली, तरी चुंभळे विरूद्ध पिंगळे या पारंपरिक लढतीपेक्षाही दोन भावांच्या म्हणजे पिंगळे विरूद्ध पिंगळे यांच्या लढतीची चर्चा रंगत आहे.

दोन्ही उमेदवार हे सख्खे भाऊ जरी असले तरी बाजार समिती निवडणुकीमुळे सध्या त्यांच्यात कटूता आली असल्याची चर्चा आहे. यापूर्वी माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या बाजार समिती निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे व एकहाती निवडणूक यंत्रणा सांभाळणारे गोकूळ पिंगळे हे स्वतः यावेळी बाजार समिती निवडणुकीसाठी आपले नशीब अजमावू पाहत आहेत. यापूर्वीदेखील गोकूळ पिंगळे यांनी बाजारसमितीसाठी अर्ज दाखल केले होते. परंतु, देविदास पिंगळे यांच्या सांगण्यावरून ते अर्ज माघारीदेखील घेतले होते.

परंतु, यंदा गोकूळ पिंगळे हे अर्ज माघारी घेण्याच्या वेळेच्या अगोदर निवडणूक कार्यालयात हजर राहूनदेखील त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. तेव्हापासून दोन्ही पिंगळे भावांमध्ये आलबेल असल्याचे समोर आले. देविदास पिंगळे असो की गोकूळ पिंगळे यांचे नातेगोते एक आहे. मित्र परिवारदेखील सारखा असल्याने आता मदत नक्की कुणाला करावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शिवाजी चुंभळे, देविदास पिंगळे आणि गोकूळ पिंगळे हे तिघे ही सोसायटी सर्वसाधारण गटातून उमेदवारी करत आहेत. त्यामुळे या गटाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर, गोकूळ पिंगळे विजयी झाले तर ते सत्तास्थापन करणार्‍या गटाला पाठिंबा देणार की अलिप्त राहून भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाचे मुद्दे 

First Published on: April 27, 2023 12:23 PM
Exit mobile version