अंडरपासमधील कॅमेरे; नियमभंग करणार्‍या २,२५० वाहनांवर कारवाई

अंडरपासमधील कॅमेरे; नियमभंग करणार्‍या २,२५० वाहनांवर कारवाई

CCTV camera

बेशिस्त वाहनधारकांवर आर्टीफिशियल इंटेलिजन्स आधारित सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. या यंत्रणेमुळे शहर वाहतूक शाखेला वाहनचालकांचा परवाना निलंबित करणे किंवा कडक कारवाई करणे सोपे झाले आहे. विरूद्ध दिशेने येणार्‍या २,५५० वाहनचालकांवर नियमभंगाची कारवाई व नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातून वाहतूक शाखेने ५ लाख १० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

इंदिरानगर अंडरपासमधून विरूद्ध दिशेने जाणार्‍या बेशिस्त वाहनधारकांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणेचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या यंत्रणेमुळे एकेरी वाहतुकीचा नियम तोडणार्‍या वाहनचालकांना घरपोच दंडाची नोटीस पाठवली जात आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. मात्र, या ठिकाणी पोलीस असेपर्यंत वाहतूकीला शिस्त असते, ते नसले की पुन्हा दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होते. त्यातून वाहतुक व्यवस्था कोलमडत आहे. इंदिरानगर अंडरपासजवळ २४ तास पोलिसांची नियुक्ती करणे शक्य नसल्याने पोलिसांसाठी ही नवी यंत्रणा फायद्याची ठरत आहे. नियम तोडणार्‍या वाहनचालकांची माहिती यंत्रणेमार्फत वाहतूक शाखेला मिळत आहे. एका वाहनाने सलग किती वेळा नियम तोडला आहे, याची माहिती उपलब्ध होत आहे.

नंबरप्लेटसह वाहनाचा फोटो

इंदिरानगर अंडरपासमध्ये ३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गोविंदनगरकडून इंदिरानगरच्या दिशेने येणार्‍या वाहनांवर कॅमेर्‍याची करडी नजर ठेवली जात आहे. गोविंदनगरकडून एखादे वाहन अंडरपासच्या दिशेने आले तर हुटर जोरात आवाज करून वाहनचालकास पुढे न येण्याचा इशारा देईल. त्यानंतरही चुकीच्या दिशेने नेल्यास ए. आय. कॅमेरे नंबरप्लेटसह संपुर्ण वाहनाचा फोटो काढत आहेत.

राज्यातील पहिली यंत्रणा

ए. आय. तंत्रज्ञानावर अनेक अ‍ॅप विकसित झाले आहेत. मात्र, वाहतूक नियोजन व त्यातून दंडवसुलीचा प्रयत्न झालेला नव्हता. त्यामुळे आर्टीफिशियल इंटेलिजन्स आधारित सीसीटीव्ही यंत्रणा राज्यात एकमेव यंत्रणा असल्याचा दावा शहर वाहतूक शाखेने केला आहे. कॅमेर्‍यांनी टिपलेले फोटो लागलीच वाहतूक शाखेच्या सर्व्हरवर पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर वाहतूक शाखा वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकांच्या पत्यावर दंडाची नोटीस पाठवून दिली जात आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर वाहनचालकांना थेट न्यायालयात पाठविले जात आहे.

First Published on: June 22, 2019 11:59 PM
Exit mobile version