कर्नाटकातून जोडप्याला शोधण्यासाठी पोलीस झाले एलआयसी एजंट

कर्नाटकातून जोडप्याला शोधण्यासाठी पोलीस झाले एलआयसी एजंट

कर्नाटकमध्ये पळून गेलेल्या अल्पवयीन जोडप्याला शोधण्यासाठी शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी यांनी परराज्यात पोलिसांसह स्थानिक नागरिकांची कोणत्याही मदतीचा शाश्वती नसताना… मिळालेल्या लोकेशनवर दोघेही नसताना…चौकशी करतेवेळी स्थानिक नागरिकांनी घेराव घातला असताना… एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवरुन वेशांतर करत त्याला ताब्यात घेतले. गोसावींनी पोलिसी खाक्या दाखवताच संशयिताने पळून आलेल्या जोडप्याचा ठावठिकाणा सांगितला.

नाशिक शहरातील अल्पवयीन मुलगी व मुलगा अंबड पोलीस ठाण्यातून तक्रार शहर पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे आली होती. त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी यांनी शोधमोहीम सुरु केली. प्रेरणा (नाव बदलेले)च्या कुटुंबियांसह मैत्रिणींशी गोसावींनी संवाद साधला. ती सर्वाधिक मोबाईलवर कोणाशी बोलायची, याचा शोध घेतला. तरीही, हाती काही लागले नाही.गोसावींनी तिच्या आईचा मोबाईल ताब्यात घेत तपास केला असता प्रेरणा एका मोबाईल क्रमांकावर जास्त वेळ बोलत असल्याचे समोर आले. त्यानुसार गोसावींनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेची मदत घेतली. त्यात तो मोबाईल क्रमांक तिच्या प्रियकराचा असल्याचे समोर आले. त्या मोबाईलचे लोकेशन कर्नाटकमध्ये येत असल्याचे गोसावींना समजले. त्यानुसार गोसावी कारने प्रेरणाच्या वडिलांसह कर्नाटकमध्ये आले. मात्र, कर्नाटकमध्ये आल्याने मोठे आव्हान निर्माण झाले होते. कर्नाटक पोलिसांसह स्थानिक नागरिक मदत करतील, याची शाश्वती नव्हती. नाशिक शहर सायबर शाखेने दिलेल्या करंट लोकेशन, टॉवर लोकेशन, एडीआर व सीडीआर देवून मदत केली. तरीही, लोकेशननुसार गोसावींना प्रेरणाचा ठावठिकाणा लागत नव्हता. गोसावींसह तिचे वडील कर्नाटकमध्ये २४ तासांहून अधिक वेळ तिचा शोध घेत होते. तरीही, तिचा ठावठिकाणा लागत नव्हता.

रात्रभर त्यांनी सुरुवातीच्या लोकशनवर कारमध्येच रात्रभर तळ ठोकला. दरम्यान, गोसावींनी रात्री १०.३० वाजता कर्नाटक पोलिसांची मदत घेतली. सुरुवातीला कर्नाटक पोलीससुद्धा आश्चर्यचकित झाले होते की, नाशिकचा पोलीस अधिकारी कर्नाटकात मोठ्या धाडसाने तपास करत आहे. ती सापड$ कर्नाटक पोलिसांकडून मदत मिळो किंवा न मिळो पण प्रेरणाला शोधून काढायचे, असा निश्चय गोसावींनी केला होता. ते रात्रभर जागे राहिले. पहिल्या लोकेशनवर त्यांना संशय असल्याने त्यांनी एका घराजवळ जात चौकशी सुरु केली. त्यावेळी आजूबाजूचे लोक लगेच जमा झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घातला. या ठिकाणी अनोळखी मुलगी व मुलगा आले नसल्याचे नागरिकांनी गोसावींना सांगितले. त्यावेळी गोसावींना एकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. गर्दीमुळे गोसावींना त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. पण, गोसावींनी संशयित व्यक्तीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे सुरु केले. रात्रभर त्या व्यक्तीवर पाळत ठेवली.

पहाटे ४ वाजता त्या व्यक्तीच्या घरी गोसावी गेले. एलआयसी एजंट आहे, तुम्ही कर्जाचे हप्ते न भरल्याने गाडी जप्त करण्यासाठी आलो आहे. मार्ग काढण्यासाठी कारमध्ये बसा, असे गोसावींनी सांगताच संशयित व्यक्ती कारमध्ये बसला. तो कारमध्ये येताच गोसावींना त्याला पोलिसी खाक्या दाखवला. एलआयसी एजंट नसून नाशिक पोलीस आहे. नाशिकहून पळून आलेल्या जोडप्याचा ठावठिकाणा सांगा अन्यथा पोलीस कारवाई होईल, असे सांगत गोसावींनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्या व्यक्तीने गोसावींना दोघांचा ठावठिकाणा सांगत ते सुखरुप असल्याचे सांगितले. त्यानंतर संशयिताने सांगितलेल्या पत्यावर सर्वजण कारने ३० किलोमीटर अंतरावर गेले. दरम्यान, गोसावींनी काही मोबाईल क्रमांक संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये डायल केले, इनकमिंग व आऊटगोईंग कॉल चेक केले. त्यामध्ये सर्व संशयित क्रमांक त्याच्या मोबाईल आढळून आले. तितत्क्यात कर्नाटक पोलीस त्यांच्याजवळ आले. तपासासाठी गोसावींनी पटकन त्या मोबाईलमधील क्रमांकाचे स्क्रीन शॉट घेत मदतीसाठी मोबाईल कर्नाटक पोलिसांना दिला. त्यानंतर कर्नाटक पोलीस निघून गेले.

पहाटे कर्नाटक पोलिसांचा कॉल आला की, तुम्ही शोधत असलेला मुलगा व मुलगी सापडली आहेत. त्यानुसार गोसावी व कर्नाटक पोलिसांनी एकत्रित सकाळी ६ वाजता दोघांना ताब्यात घेतले. प्रेरणा सुखरुप असल्याने तिच्या वडिलांच्या जीवातजीव आला. गोसावींना दोघांना अंबड पोलीस ठाण्यात आणले. प्रेरणासह मुलाच्या कुटुंबियांना आईवडिलांच्या स्वाधीन केले.

First Published on: August 25, 2021 9:05 AM
Exit mobile version