दहा हजारांची लाच घेतांना पोलिस हवालदार जाळ्यात

दहा हजारांची लाच घेतांना पोलिस हवालदार जाळ्यात

नाशिक : पोलिस हवालदार हरी जानू पालवी यास तक्रारदाराकडून हजाराची लाच घेतांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार पिंपळगाव दाभाडी, (ता. चांदवड) येथील रहिवासी आहे.

हरी पालवी यांची नेमणूक चांदवड पोलिस ठाण्यात आहे. ५९ वर्षीय तक्रारदार व त्यांचे भाऊ यांची रायपूर (ता. चांदवड) येथे शेत जमीन असून या शेत जमिनीतील एक सामाईक रस्त्याच्या वहीवाटीवरून त्यांच्या भावा भावांमध्ये वाद व हाणामारी होऊन त्यांच्यात परस्पर विरोधी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांच्यावतीने त्यांचे भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात संशयिताविरुद्ध वाढीव कलम लाऊन संशयितांना अटक करण्यासाठी हवालदार हरी जानू पालवी यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार लचेची मागणी केली. तडजोडीअंती पहिला हप्ता १० हजार गुरुवारी देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चांदवड येथे येऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान हवालदार हरी जानू पालवी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यापैकी दहा हजार चांदवड येथील गणुर चौफुली येथील एका चहाच्या दुकानावर स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, भूषण शेटे, भूषण खलाणेकर, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रशांत बागूल, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी केली आहे.

First Published on: June 2, 2023 12:57 PM
Exit mobile version