लष्कराचे फोटो पाकमध्ये पाठवणार्‍या तरुणाला पोलीस कोठडी

लष्कराचे फोटो पाकमध्ये पाठवणार्‍या तरुणाला पोलीस कोठडी

भारतीय लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र असलेल्या देवळाली कॅम्प येथील प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पाकिस्तानी व्हॉट्स अ‍ॅप नंबरवर पाठवणार्‍या तरुणाला पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करत रविवारी (दि.४) नाशिकरोड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हेरगिरीच्या शक्यतेमुळे गुप्तचर यंत्रणा, लष्करासह पोलीसही सतर्क झाले असून, हेरगिरीचे नाशिक कनेक्शन आणि ठेकेदाराच्या चौकशीसह तरुणाच्या बिहारमधील मूळ ठावठिकाणाचा शोध सुरू आहे. संजीव कुमार (मूळ रा. अलापूर, बरौली, गोपालगंज, बिहार) असे शिक्षा झालेल्या संशयिताचे नाव आहे.

संजीव कुमार हा महिनाभरापासून लष्करी भागात एका ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करत होता. शनिवारी सकाळी गेटवरील लष्करी जवानांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागातील फोटो पाकिस्तानातील मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचे आढळुन आलेे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. लष्करी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या व्यक्तीची सखोल चौकशी करत असून, लष्करी विभागाचा फोटो पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावर पाठवणे हा हेरगिरीचा प्रकार असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून रविवारी नाशिकरोड न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

First Published on: October 4, 2020 8:50 PM
Exit mobile version