पर्यटन स्थळांवर गर्दी करणार्‍यांना दाखवणार पोलिसी खाक्या

पर्यटन स्थळांवर गर्दी करणार्‍यांना दाखवणार पोलिसी खाक्या

नाशिक : पावसाळयात पर्यटकांची पावलं निसर्ग पर्यटनासाठी धबधबे, धरणांकडे वळू लागतात. सध्या राज्यासह जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मागील पाच दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. असे असतांनाही काही अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून धरण परिसरात तसेच नद्यांच्या प्रवाहात स्टंट करतांना दिसून येत आहेत. मात्र आता या अतिउत्साही पर्यटकांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून आता दंडुकेशाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

नद्यांमधून पाण्याचा प्रवाह वाढला असताना लोक स्टंट करण्यास पसंती देत आहेत.नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍याचे आठही दरवाजे उघडे असताना व येथील पुलावरून पाणी असतानाही लोक त्यावरून सर्रास वाहने घेऊन जात आहेत. याशिवाय पाण्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी जीवघेणे स्टंट देखील केले जात आहेत. गिरणा नदीपात्रात एका तरुणाने उडी मारल्याचा स्टंट सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या पाटील यांचे या सर्व प्रकारांकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र आता पर्यटकांवर पोलीसी कारवाई करण्याचा इशारा देतांनाच बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाणी पातळी देखील वाढली आहे. पाटबंधारे विभाग आणि पोलिसांत समन्वय असून त्यानुसार नियोजन सुरू आहे. काही पूलांवर पाणी असतानाही लोक तेथून वाहने नेत आहेत. अशा पूलांचा वापर कटाक्षाने टाळावा. नागरिकांनी जोखमीच्या ठिकाणी जाऊ नये, सेल्फी काढून स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. पर्यटन स्थळांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होते आहे. पर्यटकांच्या अति उत्साहाला आवर घालण्यासाठी पर्यटन स्थळांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. : सचिन पाटील, पोलीस अधिक्षक

First Published on: July 14, 2022 4:41 PM
Exit mobile version