महाजन म्हणतात, मी फोडाफोडीत माहीर

महाजन म्हणतात, मी फोडाफोडीत माहीर

नाशिक, नगर, धुळे, जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. जिथे एक नगरसेवक होता तिथे थेट बहुमतात येण्याची किमया आपण केली. यावरून मी काय करू शकतो याची प्रचिती तुम्हाला आली असेल. म्हणूनच मुख्यमंत्री विशेष मोहिमांसाठी माझी निवड करतात. त्यामुळे तुम्हीही आश्वस्त राहा केवळ प्रामाणिकपणे काम करा बाकी मी बघतो. तसंही फोडाफोडीत मी माहीर असल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आतापर्यंत आपण केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचे किस्से सांगत नाशिक मतदारसंघातही चमत्कार करून दाखवू, असा दावा केला.

लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शिवसेना आणि भाजप युतीची मनोमिलन बैठक पाथर्डी फाट्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास पार पडली. या बंद दाराआड झालेल्या बैठकित राज्यशासनाचे संकटमोचक बिरुदावली मिळवलेले गिरीश महाजन आणि शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. नाशिक येथे चौथ्या टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी पक्षांतर्गत नाराजांच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी आपण संकटमोचक म्हणून कसे काम केले याचे किस्से ऐकवले. नाशिक, धुळे, नगर, जळगाव महापालिकेत आम्ही कमाल केल्याचे त्यांनी सांगितले. धुळ्याच्या निवडणुकीत आमचे मित्र अनिल गोटे यांना एक तरी उमेदवार निवडून आणून दाखवा, असे आव्हान दिले होते. ठिक आहे त्यांनी एक उमेदवार निवडून आणला असला तरी, धुळयात आम्ही ३ वरून थेट बहुमातात पोहोचलो. जळगावलाही तेच झाले. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत तुम्ही निर्धास्त राहा ही जागा आपण जिंकल्यातच जमा असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकच्या जागेसाठी आम्ही सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त काम करा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला भाजप, शिवसेनेचे उमेदवार, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अनिल कदम, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते.

तुमच्या नेत्यांनीही मला मागुन घेतले

शिवसेना पक्षप्रमुखांनी वर्षावर सांगितलं की मी फक्त एका माणसामुळे युती केली आहे आणि त्यांनी माझं नाव घेतलं. इतकंच नव्हे तर ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मला सेनेसाठी मागून घेतले आहे. ते नेहमी माझी मुक्तकंठाने स्तुती करतात. राजकारणात असे पाहायला मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

बैठकीत निष्ठावंतांना डावलले

शिवसेना, भाजप युतीच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे नेते बैठकीला हजर होते. यावेळी प्रमुख पदाधिकारर्‍यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले. मात्र शिवसेनेत गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि महापौरपद भूषवलेल्या एका पदाधिकार्‍यास खाली बसवल्याने समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनीही अनुपस्थिती लावल्याचेच दिसून आले.

First Published on: March 29, 2019 2:12 PM
Exit mobile version